वसई: वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळी काहीशी उसंत घेतल्यामुळे काही वसई विरारमधील पश्चिम पट्ट्यातील वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा काही अंशी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. पण, सखल भागातील पाणी न ओसरल्यामुळे या भागातील परिस्थिती अजूनही बिकट असल्याचे दिसून येत आहे.

वसई विरार शहरात गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसईतील एव्हरशाईन सिटी मधुबन, सातिवली, तुंगारफाटा, नौपाडा, चुळणे, रेल्वे स्थानक परिसर, नालासोपाऱ्यातील गालानगर, संतोषभुवन, मोरेगाव, रेल्वे स्थानक परिसर, विरारमधील कोफराड, अर्नाळा, नंदाखाल, आगाशी, नायगाव अशा विविध ठिकाणी पाणी साचले आहे.

बुधवारी पावसाने उसंत घेतल्यावर पश्चिम पट्ट्यातील वीज पुरवठा आणि इंटरनेट सुविधा अंशतः सुरू झाली असून त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण, वसई पूर्व, विरार पूर्व आणि पश्चिम तसेच नायगाव आणि नालासोपाऱ्यातील बहुतांश भागात अजूनही वीज नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

तीन ते चार दिवस सलग अंधारात काढल्यानंतर आगाशी, नंदाखाल, उंबरेगोठण आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांनी वटार येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील रहिवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत नागरिकांनी जाबही यावेळी विचारला.