वसई: वसई विरार शहरात सध्या जागोजागी जलवाहिन्या अंथरण्यासाठी तसेच गटाराच्या दुरुतीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. पण, बांधकाम साहित्याचा वाढलेला खर्च, मजुरांची कमतरता अशा विविध कारणांमुळे ही कामे संथ गतीने सुरु असून खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

वसई विरार शहरात महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी विविध ठिकाणी खोदकाम करून जलवाहिन्या अंथरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी गटारबांधणी, गटारांचे रुंदीकरण यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे.

शहरातील मुख्य आणि जोडरस्ते खोदण्यात आले असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते उंचसखल झाले असून, पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे भीती वाढली आहे. तर याच रस्त्यांवर वाढलेल्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारांना बसत आहे.

तसेच ओबडधोबड रस्त्यांमुळे माणिकपूर, बंगली नाका सारख्या अरुंद रस्त्यांवर वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. तर वाहनांच्या या धीम्या वाहतुकीमुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास होणाऱ्या वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली आहे. रस्त्याच्या शेजारील पदपथसुद्धा आता धुळीने माखत असल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांवरून चालणे मुश्किल होऊन बसले आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना केल्या जातील असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.