वसई: साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘साहित्य जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी विरारमध्ये करण्यात आले आहे. साहित्यिक आणि सांस्कृतिक सत्रांनी नटलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थितीत असणार आहेत. वसई-विरार महानगरपालिका (ग्रंथालय विभाग), ज्ञानदीप मंडळ, संत जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, १२ एप्रिल रोजी विरार पश्चिमेतील संत जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा २३ व्या साहित्य जल्लोष या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात सत्पाळा नाका ते संत जोसेफ महाविद्यालय या मार्गावर काढण्यात येणाऱ्या ग्रंथदिंडीने होणार आहे. सकाळी ९ ते १० या वेळेत येणाऱ्या या दिंडीत उपमहापौर मार्शल लोपीस आणि साहित्यिक मॅक्सवेल लोपीस सहभागी होणार आहेत. तर गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अजीव पाटील, अभिनेते अरुण नलावडे आणि ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै उपस्थित असणार आहेत. दुपारी १२ ते १.३० या वेळेत ‘ज्येष्ठ संपादक मुलाखत’ सत्र आयोजित करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ संपादक मधुकर भावे आणि कमलेश सुतार सहभागी होणार असून, संवादक म्हणून कुणाल रेगे उपस्थित राहतील. तर दुपारी ३ ते ५ या वेळेत कवी संमेलन रंगणार असून यात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि अरुण म्हात्रे यांच्यासह स्थानिक कवी कवितांचे सादरीकरण करणार आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटच्या आणि संध्याकाळच्या सत्रात चौरंग निर्मित अत्रे अत्रे सर्वत्रे या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. अशोक हांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, वसई-विरारसह परिसरातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.