वसई: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या लाडक्या श्री गणेशाच्या आगमनासाठी वसई-विरारमधील चित्रशाळांमध्ये सध्या लगबग पाहायला मिळत आहे. मूर्तींची अंतिम टप्प्यातील रंगरंगोटी पूर्ण होत असतानाच, यंदा गणेशभक्तांचा कल पारंपरिक आणि शाही स्वरूपाच्या सजावटीकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. श्रीगणेशाचे रूप अधिक सुबक आणि आकर्षक दिसावे यासाठी फेटे, पगडी, धोतर आणि हिरेजडित सजावटीचा साज चढविलेल्या मूर्तींना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

​महाराष्ट्रात फेटा हा रुबाब आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो. याच संस्कृतीचा सुरेख संगम आता गणेशमूर्तींमध्ये पाहायला मिळत आहे. मूर्तींना सजवण्यासाठी पैठणी, जरीचे आणि विविध रंगांचे कापड वापरून कलात्मक फेटे बांधले जात आहेत. यामध्ये विशेषतः तुरा असलेले फेटे आणि गोलाकार कलाकृतीतील श्रीकृष्ण फेट्यांना अधिक मागणी आहे.

याशिवाय सिल्क शाईन कापडाचे धोतर आणि आकर्षक पगड्या बांधून गणेश मूर्तींचे सौंदर्य अधिक फुलवले जात आहे. केवळ साध्या रंगरंगोटीपेक्षा अशा वस्त्रांनी सजवलेल्या मूर्तींचे आकर्षण यंदा अधिक वाढले आहे. दोन फुटांची अशी फेटे व हिरेजडित सजावट असलेली मूर्ती बाजारात साधारण सात ते आठ हजार रुपयांना विकली जात आहे.

​या विशेष सजावटीसाठी कलाकारांना प्रचंड मेहनत आणि वेळ द्यावा लागत आहे. एका मूर्तीला सुबक फेटा बांधण्यासाठी जवळपास एक ते दीड तास लागतो. मागील पाच वर्षांत अशा फेट्यांच्या मूर्तींची मागणी लक्षणीयरीत्या वाढल्याचे कलाकार सागर पाटील यांनी सांगितले.

​फेट्यांसोबतच मूर्तींवर केली जाणारी हिरे-मोत्यांची नक्षीकाम ही यंदाची दुसरी मोठी खासियत ठरत आहे. गणपती बाप्पाच्या डोक्यावरील मुकुट, गळ्यातील कंठी, हातातील कडी आणि इतर आभूषणांवर बारीक हिरे व मोती अत्यंत नाजूकपणे बसवले जात आहेत. हिऱ्यांची सजावट करताना कमालीची एकाग्रता बाळगावी लागते, त्यामुळे एका मूर्तीचे काम पूर्ण करण्यासाठी कधी तीन तर कधी चार तास लागतात, अशी माहिती हिरे सजावट कलाकार आर्या पाटील यांनी दिली आहे.

वसई विरार शहरातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. मागील काही वर्षांपासून गणेशमूर्तींची संख्या वाढत आहे. अनेकजण दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस व दहा दिवस अशा स्वरूपात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करीत असल्याने गणेशमूर्तींना मागणी वाढू लागली आहे. आधी मूर्ती तीन हजार रुपयांना मिळत होती तीच आता चार ते साडेहजार रुपयांना विक्री होते असे गणेश मूर्तीकारांनी सांगितले आहे.