वसई: वसई विरारमध्ये विविध शाळा, राजकीय पक्ष, सामाजिक आणि शासकीय संस्थांसह खाजगी गृहसंकुल आणि दुर्गप्रेमींकडून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध ठिकाणी ढोलताशाच्या गजरात  पारंपरिक पद्धतीने शोभायात्रही काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसरात जल्लोष संचारला होता.

दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या जल्लोषात वसई विरार शहरात साजरी करण्यात आली. यासाठी गुरुवार सकाळपासूनच ढोल-ताशा पथकांनी मिरवणुकांच्या ठिकाणी हजेरी लावली होती. सुशोभित केलेल्या मखरात शिवरायांची मुर्ती विराजमान करून पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच वसई पश्चिमेतील वसई किल्ला आणि विरार येथील अर्नाळा किल्ल्याच्या ठिकाणी दुर्गप्रेमींनीही मोठी गर्दी केली होती. वसई विरार महापालिकेतही महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह पालिका अधिकारी व कर्मचारी आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तर राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्था यांच्या मार्फत रक्तदान शिबिर व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.

वसई विरारमधील खाजगी गृहसंकुलांमध्येही शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळाला. विरारमधील म्हाडा कॉलनी, ग्लोबल सिटी या ठिकाणी पारंपरिक वेशभूषा करून भगवे फेटे आणि झेंडे हाती घेऊन जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. तसेच यावेळी महिलांनी लेझिम आणि ढोल ताशाच्या तालावर ठेकाही धरला होता. यामुळे वसई विरारचा परिसर शिवमय झाल्याचे चित्र दिसून आले.