वसई:- वसई-विरार महापालिकेच्या क्रीडा संकुल व नाट्यगृहाच्या उद्घाटनावरून निर्माण झालेला वाद आता अधिक पेटला आहे. सत्ताधारी बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. बहुजन विकास आघाडी आपल्या चुका मान्य करण्याऐवजी त्यांचे समर्थन करत आहे आणि शासकीय नियमांची पायमल्ली करत आहे, असा थेट आरोप भाजपचे पालिकेतील विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ​तसेच,महापौरांवर पक्षाचा मोठा दबाव असून पराभूत नेतृत्वाला रीलाँच करण्याची जबाबदारी महापौरांवर सोपवण्यात आली आहे, असा घणाघात मनोज पाटील यांनी केला.
​
​क्रीडा संकुल आणि नाट्यगृहाच्या उद्घाटनावरून सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी महापौर अजीव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राजशिष्टाचाराच्या नियमांवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवारी भाजपचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बहुजन विकास आघाडीवर जोरदार टीका केली.

​मनोज पाटील यांनी महापौरांच्या वक्तव्यावर टीका करताना सांगितले की शासकीय निर्णय म्हणजे कायदा नाही, असे वक्तव्य करून घटनात्मक पदावर बसलेल्या महापौरांनी अराजकता माजवणारी भूमिका घेतली आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. ​ते पुढे म्हणाले की लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा व राजशिष्टाचाराचा मान ठेवणे ही महापालिकेची घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, महापालिका आयुक्तांना अंधारात ठेवून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण पत्रिका मंजूर न करून घेता महापौरांनी परस्पर निमंत्रणे पाठवून निव्वळ राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ही पाटील यांनी केला.

​१८ महिन्यांच्या कामाला इतकी वर्षे का?

​प्रकल्पाच्या दिरंगाईवर बोट ठेवत पाटील यांनी सवाल उपस्थित केला की, “जे काम अवघ्या १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते, त्याला इतकी वर्षे का लागली? ​तसेच, करण्यात आलेले उद्घाटन हे केवळ पक्षाच्या राजकीय स्वार्थासाठी करण्यात आले आहे. आमचे वाढदिवस महापालिकेनेच साजरे करावेत’ अशीच भूमिका बहुजन विकास आघाडीची राहिलेली आहे असा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला.

​पुन्हा अधिकृत उद्घाटनाची भाजपची मागणी

​नाट्यगृह व क्रीडा संकुल यांचे बेकायदेशीरपणे आणि राजशिष्टाचाराचे उल्लंघन करून उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे नियमानुसार या दोन्ही वास्तूंचे पुन्हा एकदा अधिकृतपणे उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी भाजपने महापालिका आयुक्तांकडे केली आहे