वसई:- बहुप्रतिक्षित वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नवनिर्माणाधीन क्रीडा संकुलाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून जोरदार राजकीय वाद पेटला आहे. येत्या ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून भारतीय जनता पक्षाने पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.
नालासोपारा पूर्वेतील मजेठिया येथील नाट्यगृह आणि विरार बोळिंज म्हाडा येथील क्रीडा संकुल गेल्या ६ ते ८ वर्षांपासून रखडले होते. अखेर ३ ऑक्टोबर रोजी या दोन्ही वास्तूंचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या सोहळ्यासाठी महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली निमंत्रण पत्रिका महापालिका अधिकाऱ्यांकडूनच सर्वांना सर्क्युलेट केली जात असल्याचा गंभीर आरोप करत आता भाजपने महापालिका अधिकाऱ्यांनाच थेट धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह गुरुवारी सायंकाळी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांची भेट घेतली. प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर जोरदार प्रहार करत सदर लोकार्पण पालिका इमारतीचे आहे की एखाद्याच्या खासगी प्रॉपर्टीचे? असा सवाल विरोधीपक्ष नेते मनोज पाटील यांनी उपस्थित केला.
या सोहळ्याचे निमंत्रण पूर्णपणे नियमबाह्य असून त्याद्वारे राजशिष्टाचाराचा उघडउघड भंग करण्यात आला आहे. सरकारी आणि पालिकेच्या अधिकृत कामांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलून विशिष्ठ वर्गाची लाचारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. तुमच्या विरोधात हक्कभंग का आणू नये? असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भाजपने घेतलेल्या या कडक आक्षेपानंतर अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांची चांगलीच कोंडी झाली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत स्वतः अनभिज्ञ असल्याचे सांगत बचावात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रकरण चिघळत असल्याचे पाहून, महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याशी तातडीने चर्चा करून येत्या काही तासांत यावर अधिकृत माहिती आणि स्पष्टीकरण दिले जाईल, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी केला.
