वसई: वसई-विरार शहर महापालिकेच्या बहुचर्चित आणि तब्बल ८ वर्षांपासून रखडलेल्या क्रीडासंकुलाचे अखेर शनिवारी ३ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या संकुलाचे लोकार्पण केले जात असले, तरी प्रत्यक्षात या क्रीडासंकुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच आहे.

​शहरातील खेळाडूंना सरावासाठी मुंबईतील मैदानांवर अवलंबून राहावे लागत असल्याने वसईत सुसज्ज क्रीडासंकुल उभारण्याची मागणी नागरिकांमधून वर्षानुवर्षे केली जात होती. त्यानुसार महापालिकेने नोव्हेंबर २०१७ मध्ये या संकुलाचे भूमिपूजन करून २०१८ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. ‘एन. ए. कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदार कंपनीला ४३ कोटी रुपयांचे काम देण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे मागील ८ वर्षांत या क्रीडासंकुलाचा प्रकल्प खर्च ४३ कोटींवरून थेट ६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इमारतीची अंतर्गत रचना बदलल्याने आणि ‘जीएसटी’मुळे खर्चात वाढ झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

याच दरम्यान या क्रीडासंकुलाचे शनिवारी सायंकाळी उदघाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परंतु अद्याप या क्रिडा संकुलाचे काम पूर्ण झालेले नाही. क्रिडा संकुलाचे मैदानाचे काम अर्धवट आहे. त्यावर भराव करून ट्रॅक तयार करायचा आहे. त्याला अजून दोन ते तीन महिने लागतील. तसेच क्रिडा संकुलात लिफ्ट तसेच अनेक प्राथमिक सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. तर संकुलाच्या इमारतीत ही अनेक खेळाचे साहित्य अजून फिटिंग केले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्घाटन असल्याने आता या कामाला गती देऊन घाईघाईने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे.

क्रीडा संकुलाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे असा दावा महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे यांनी केला आहे. तर उर्वरित काम हे डिसेंबर अखेर पर्यँत पूर्ण केले जाणार आहे. जीएसटी तसेच इमारचीच्या संरचनेत बदल झाल्याने खर्चात वाढ झाली होती, असे महापालिकेेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले.

नागरिकांना सुविधा देण्यावर आमचा भर – महापौर अजीव पाटील

प्रशासकीय राजवट आणि कोरोनाच्या काळामध्ये काही विकासकामे रखडली होती. महापालिकेत आम्ही सत्तेत आल्यानंतर नागरिकांना आवश्यक असलेल्या सुख सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. क्रीडासंकुल आणि नाट्यगृह ही माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची ही संकल्पना होती. त्यानुसार या कामाला गती देऊन पूर्णत्वास आले आहे. त्याचे उद्घाटन ३ तारखेला माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाला होत आहे. असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले. याबाबत ​सर्वांना ज्या पद्धतीने मान-सन्मान द्यायला पाहिजे, त्या पद्धतीने निमंत्रण पत्र पाठवलेली आहेत. कुठल्याही प्रकारचा वादंग किंवा वाद नसून मी स्वतः सर्व सदस्यांशी बोललेलो आहे. तसेच प्रशासन ही आमच्या सोबत आहे असेही पाटील यांनी सांगितले.

क्रीडा संकुल कसे असेल ?

उभारण्यात येत असलेले क्रीडा संकुल हे २८ हजार चौरस मीटर क्षेत्रात असून त्यात ८ हजार चौरस मीटर क्षेत्रात तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या संकुलात पिकल बॉल, लांब उडी, गोळाफेक , चारशे मिटरचा सिंथेटीक ट्रॅक, टेबल टेनिस कोर्ट, कुस्ती, योगा खोली, झुंबा खोली, कॅरम, बॉक्सींग, बास्केटबॉल, व्यायामशाळा, स्क्वॅश आदी विविध खेळांच्या सुविधांचा समावेश आहे.

जलतरण तलाव वगळला?

या क्रीडासंकुलाच्या मूळ आराखड्यात जलतरण तलावाचा (स्विमिंग पूल) समावेश होता. मात्र सद्यस्थितीत तो वगळण्यात आल्याची चर्चा आहे. यावर स्पष्टीकरण देताना महापालिकेने सांगितले की,कार्यादेशात स्विमिंग पूल प्रस्तावित आहे, तो रद्द केलेला नाही, केवळ सध्या त्याची अंमलबजावणी केलेली नाही असे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले आहे.