वसई: ३ ऑक्टोबरला वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित क्रीडा संकुल व नाट्यगृह उद्घाटन निमंत्रण पत्रकावरून राजकीय वाद पेटला आहे. भाजपने यावर आक्षेप घेत राजशिष्टाचाराचा उघडपणे भंग करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून बविआ नेते व महापौर अजीव पाटील यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. आयोजित केलेला कार्यक्रम नियमानुसारच असल्याचे महापौरांनी सांगितले आहे.
नालासोपारा पूर्वेतील मजेठिया येथील नाट्यगृह आणि विरार बोळिंज म्हाडा येथील क्रीडा संकुल गेल्या ६ ते ८ वर्षांपासून रखडले होते. अखेर ३ ऑक्टोबर रोजी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या दोन्ही वास्तूंचा उद्घाटन सोहळा आयोजित केला असून या सोहळ्यासाठी महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या वतीने निमंत्रण पत्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
भाजपने सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नेते व महापौर अजीव पाटील यांनी काढलेल्या निमंत्रण पत्रावर आक्षेप घेतला असून नियम भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या आरोपाला महापौर अजीव पाटील यांनीही प्रत्युत्तर देत भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सर्वांना ज्या पद्धतीने मान-सन्मान द्यायला पाहिजे, त्या पद्धतीने निमंत्रणं पाठवलेली आहेत. कुठल्याही प्रकारचा वादंग किंवा वाद नसून मी स्वतः सर्व सदस्यांशी बोललेलो आहे. पालकमंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांना सर्वांना निमंत्रण पत्र दिले आहे. हे जे काम आहे ते लोकांच्या सोयीसाठी व हितासाठी आहे असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.
तसेच या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वेळ मागितली होती. परंतु महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीमुळे त्यांची वेळ मिळू शकली नाही, नाहीतर त्यांनाही निमंत्रित केले असते. वैयक्तिकरीत्या कोणाचीही तक्रार आलेली नसून हा कार्यक्रम पूर्णपणे नियमानुसार चाललेला आहे. मिरा-भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीचे महापौरांप्रमाणेच नियमानुसार काम केले जात आहे. संपूर्ण प्रशासन सोबत असून सर्व पक्षांचे नगरसेवक आणि सदस्य यामध्ये सहकार्य करत आहेत असे महापौर अजीव पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
श्रेय घेण्यासाठी भाजपची खेळी
भाजप कडून विविध विकास कामे व निर्णयाला केवळ श्रेय मिळावे म्हणून आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपमहापौर मार्शल लोपीस यांनी केला आहे. ज्यांनी या क्रीडा संकुलासाठी प्रयत्न केले आहेत त्यांनाच त्याचे श्रेय मिळाले पाहिजे. श्रेयावरून विनाकारण वाद घालत बसल्यास काहीही साध्य होणार नाही; त्याऐवजी नवीन सूचनांचे स्वागत करून सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सर्व अंतिम अधिकार हे महापौर आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींचे असतात असेही उपमहापौर मार्शल लोपीस यांनी सांगितले.
