वसई: वसई-विरार शहर महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या नालासोपारा येथील नाट्यगृह व बोळींज येथील क्रीडा संकुलाच्या उद्घाटनावरून राजकीय नाट्य रंगले आहे. शासकीय राजशिष्टाचार डावलून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा आरोप करत, महापालिका आयुक्तांनी आज रात्रीपर्यंत या संपूर्ण प्रकरणावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा भाजपकडून नागरिकांच्या उपस्थितीत वास्तूंचे परस्पर लोकार्पण केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
विरार बोळींज येथील क्रीडा संकुलाचे व नालासोपारा मजेठीया येथील नाट्यगृहाचे ३ ऑक्टोबर २०२६ रोजी उद्घाटन होणार असल्याचे पत्र महापौर अजीव पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे. या पत्रावर भाजपने तीव्र आक्षेप घेत थेट महापालिका प्रशासनालाच घेरण्यास सुरुवात केली आहे.
या कार्यक्रमाला प्रशासकीय मंजुरी आहे का? महापालिकेची अधिकृत निमंत्रणपत्रिका का प्रसिद्ध झाली नाही? आणि शासकीय राजशिष्टाचाराला हरताळ का फाळला जात आहे? असे प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत.
महापालिका प्रशासनाने आज शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत आमदारांच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन लेखी खुलासा करावा. जर प्रशासनाने आज रात्रीपर्यंत समाधानकारक उत्तर दिले नाही, तर ३ ऑक्टोबर रोजी भाजपचे लोकप्रतिनिधी आणि नागरिक स्वतः या दोन्ही वास्तूंचे लोकार्पण करतील, असे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी सांगितले.
आमदार स्नेहा दुबे- पंडित यांच्याकडून चौकशीची मागणी
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महापालिका आयुक्तांकडे ७ प्रमुख मुद्द्यांवर तातडीने जाब विचारत या कार्यक्रमाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासकीय मंजुरी, अग्निसुरक्षा, बांधकाम पूर्णत्वदाखला, निमंत्रण पत्रिकांमधील शासकीय राजशिष्टाचार, आणि पालिका निधी व साधनसामग्रीचा अनधिकृत वापर यांसारख्या विषयांवर त्यांनी तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेली वास्तू ही सर्वसामान्य नागरिकांची मालमत्ता असून ती कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा वैयक्तिक कार्यक्रम असू शकत नाही त्यामुळे सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेचे काटेकोर पालन व्हावे अशी भूमिका आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मांडली आहे.
