वसई:- वसई विरार शहरातील बंद अवस्थेत असलेल्या दगड खाणीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. विशेषतः या दुर्घटनेत अल्पवयीन मुलांचे मृत्यू होत आहेत. नुकताच चिंचोटी परीसरात बारा वर्षीय चिमुकलीचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या वाढत्या दुर्घटनांमुळे दगडखाणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वसई विरार शहराच्या पूर्वेच्या चिंचोटी, मांडवी, कामण, पेल्हार, राजावळी, टीवरी अशा विविध ठिकाणच्या भागात दगड खाणीं आहेत. त्यातून दगडाचे उत्खनन केले जाते. वसई तालुक्यात सद्यस्थितीत ३८ दगड खाणीं आहेत. त्यातील २३ दगड खाणी या बंद असून यातील अनेक खाणीत पाणी साचून राहिले आहे. या बंद असलेल्या दगड खाणी आता मृत्यूचे सापळे ठरू लागले आहेत. दगड खाणीच्या संरक्षण भिंत आणि सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः लहान मुलांचे सर्वाधिक बळी जात आहेत.
नुकताच नायगाव पूर्वेच्या चिंचोटी बापाणे परिसरातील एका बंद खाणीत एका बारा वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनंतर शहरातील बंद अवस्थेत असलेल्या दगड खाणींच्या सुरक्षेबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यंदाच्या चालू वर्षात सहा जणांचा दगडखाणीत बुडून मृत्यू झाला असून त्यात चार मुलं ही अल्पवयीन आहेत. त्यामुळे बंद खाणी आहेत त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उपाययोजनेसाठी प्रयत्न
वसई विरार शहरातील दगड खाणी बंद अवस्थेत आहेत. बंद अवस्थेत असलेल्या दगड खाणीना संरक्षण जाळ्या बसविण्यासाठी निधी हा जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधून उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही प्रस्ताव दिला आहे असे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी सांगितले आहे. याशिवाय खासगी मालकीच्या ज्या खाणी आहेत त्यांना ही त्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना करण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
सतर्कतेचे आवाहन
शालेय विद्यार्थ्यांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्याने लहान मुलं आता विविध ठिकाणी खेळण्यास जात आहेत. यात काही मुलं दगडखाणीच्या भागात पाण्याची डबकी भरलेल्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे असे आवाहन महसूल व पोलीस प्रशासनाकडून केले आहे.
चालू वर्षातील प्रमुख घटना
१४ जानेवारी २०२६: मकर संक्रांतीच्या दिवशी जोगेश्वरीहून विरारला नातेवाईकांकडे आलेल्या विनायक सितप (४८) आणि त्यांची मुलगी ईकांशा सितप (१५) यांचा दगडखाणीत बुडून मृत्यू झाला. पोहताना वडिलांना वाचवण्यासाठी गेलेली मुलगीही पाण्यात बुडाली होती.
४ मार्च २०२६ वसई पूर्वेच्या राजावळी येथील खदाणीत बुडून १५ वर्षीय आयान मनिहार या मुलाचा मृत्यू झाला होता.
४ मार्च २०२६ विरार पूर्वेच्या मांडवी येथील जाधवपाडा येथील खदाणीत खेळायला गेलेल्या १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
२ एप्रिल २०२६ रोजी चिंचोटी येथील दगड खाणीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता.
३० एप्रिल २०२६ रोजी चिंचोटी येथील दगडखाणीत या बारा वर्षीय रूकसार हबिउल्ला खान या मुलीचा मृत्यू झाला.
