वसई: वसई-विरार शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, अखेर महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेने विविध प्रभागांत पथके नियुक्त करून कारवाईचा बडगा उगारला असून, नुकतीच प्रभाग समिती ‘डी’ मध्ये ९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात कोंडवाडे नसल्यामुळे मोकाट जनावरे थेट वर्दळीचे रस्ते, बाजारपेठा आणि महामार्गावर ठाण मांडून बसत आहेत. शहरात अनेक ठिकाणी तबेले आहेत, मात्र काही तबेलेचालकांच्या निष्काळजीपणामुळे जनावरे रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसत आहेत. यात प्रामुख्याने विरारचा अर्नाळा रोड, नालासोपारा पश्चिमेकडील चक्रेश्वर तलाव परिसर, वसई पूर्वेचा सातिवली रस्ता तसेच वसई पश्चिमेतील पापडी, स्टेला आणि माणिकपूर परिसर.
महामार्गावर आणि मुख्य रस्त्यांवर पथदिवे बंद असल्यामुळे रस्त्याच्या मधोमध बसलेली जनावरे वाहनचालकांच्या नजरेस पडत नाहीत, ज्यामुळे गंभीर अपघात घडत आहेत. तसेच रस्त्यावर पडलेल्या शेणावरून घसरून दुचाकीचालक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यात वाहनचालकांसोबतच जनावरांनाही दुखापत होत आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळी मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी होते, तर त्यांच्या मलमूत्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांकडून वारंवार होणाऱ्या मागण्या आणि महासभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर महापालिका प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील पशुपालकांच्या प्रभागनिहाय बैठका घेण्यात येऊन त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पशुपालकांची यादी तयार करण्यात आली असून, आता ज्यांची जनावरे मोकाट फिरताना आढळतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी स्वच्छता व आरोग्य निरीक्षकांचे विशेष पथक तयार करून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉ. करुणा जुईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग ‘डी’ मध्ये नुकतीच कारवाई करत ९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोंडवाड्यांअभावी गोशाळांची मदत
शहरात जनावरांना ठेवण्यासाठी हक्काचे कोंडवाडे उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेसमोर अडचण निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी उपलब्ध गोशाळांची मदत घेतली जात आहे. नुकताच विरार जवळील सकवार येथील गोशाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, त्या ठिकाणी मोकाट गाई व गुरांना ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. मोकाट जनावरांना उचलून गोशाळेपर्यंत किंवा सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या विशेष वाहनांचाप्रस्तावही तयार केला जात असल्याची माहिती डॉ. करुणा जुईकर यांनी दिली आहे.
