वसई: वसई विरार महापालिका क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात पुरेसे कोंडवाडे नसल्यामुळे भटकी जनावरे आता वर्दळीचे रस्ते, बाजारपेठा आणि महामार्गावर ठाण मांडू लागली आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून पालिकेने याबाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे.

वसई विरार मध्ये विविध ठिकाणी तबेले आहेत. या तबेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरे आहेत. पण गेल्या काही काळात तबेलेवाल्यांच्या निष्काळजीपणामुळे विरारचा अर्नाळा रोड, नालासोपारा पश्चिमेकडील चक्रेश्वर तलाव परिसर, वसई पूर्वेचा सातिवली रस्ता आणि वसई पश्चिमेतील पापडी, स्टेला, माणिकपूर अशा विविध भागात ही जनावरे रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसून येतात.

तसेच जनावरांचा मोठा कळप अनेकदा महामार्गाच्या मधोमध बसत असल्याचेही आढळून आले आहे. शहरातील वाहतुकीच्या मुख्य मार्गांवरील तसेच महामार्गावरील भागात पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध बसलेली जनावरे वाहनचालकांच्या नजरेस पडत नाहीत आणि वाहनचालकांचे अपघात होतात.

तसेच रस्त्यावर पडलेल्या शेणावरून घसरून दुचाकी चालकांचे अपघात झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. या अपघातांमध्ये वाहनचालक तर जखमी होतोच. पण, रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना देखील दुखापत होते. तसेच सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

तर या जनावरांच्या मलमूत्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.वसई विरार शहरात जागोजागी मोकाट जनावरे दिसत आहेत. अगोदरच फेरीवाल्यांमुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. तर या प्राण्यांमुळे यात अधिकच भर पडत आहे. महापालिका प्रशासन यात लक्ष घालून जनावरांच्या मालकावर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

पूर्वी महापालिकेकडून रस्त्यावर जनावर सोडल्यास ते ताब्यात घेऊन संबंधित जनावराच्या मालकावर कारवाई केली जात होती. मात्र, सद्यस्थितीत महापालिका क्षेत्राचा वेगाने विकास होत असताना कोंडवाड्यांसाठी पालिकेकडे पुरेशी जागा नसल्यामुळे फक्त दंड आकारून पकडलेली जनावरे पुन्हा मालकांच्या ताब्यात दिली जात आहेत. त्यामुळे कारवाईनंतर काहीवेळातच जनावरे पुन्हा रस्त्यावर फिरताना दिसतात, अशी प्रतिक्रियाही नागरिकांनी दिली आहे.