वसई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सुरक्षितता आणि आरोग्याचा विचार करून वसई-विरार शहर महानगरपालिकेने भटक्या श्वानांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. शहरात श्वान दंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता. महापालिकेने नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये ४५ ‘फीडिंग स्पॉट्स’ (श्वानांना खाद्य देण्याची ठिकाणे) निश्चित केली होती. या संदर्भात प्रभाग समिती ए आणि बी मध्ये चार हरकती आल्या आहेत.
वसई विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत आहे. या वाढत्या उपद्रवामुळे श्वान दंश होण्याच्या घटना समोर येत होत्या. या उपद्रवाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती. शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस डेपो आणि रेल्वे स्थानके यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी श्वानांच्या वाढत्या त्रासावर चिंता व्यक्त होत असल्याने यावर उपाय म्हणून, भटक्या श्वानांना कोठेही अन्न न घालता प्रशासनाने निश्चित केलेल्या जागीच अन्न द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याअनुषंगाने पालिकेने ही जागा निश्चिती केली आहे.
या निर्णयामुळे आता श्वानांना पाळणाऱ्या किंवा त्यांना अन्न घालणाऱ्या नागरिकांना महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच अन्न द्यावे लागणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता कमी होण्यास आणि श्वानांमुळे होणारे हल्ले टाळण्यास मदत होईल असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या या ४५ ठिकाणांबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या नोंदवण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत चार ठिकाणच्या हरकती प्राप्त झाल्या असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
४५ पैकी जवळपास चाळीस जागा या निश्चित असून ज्या हरकती आल्या आहेत त्यांचा विचार करून नवीन जागेचा शोध घेतला जात असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नवीन ११० जागांचा शोध
भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव लक्षात घेता त्यांचे व्यवस्थापन योग्य रित्या करण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत ज्या ४५ जागा आहेत त्या सुद्धा अपुऱ्या आहेत. यासाठी त्या जागेची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी महासभेत ही लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. त्यानुसार आता आणखीन नवीन ११० जागांचा शोध घेऊन ‘फीडिंग स्पॉट्स’ (श्वानांना खाद्य देण्याची ठिकाणे) तयार केले जाणार आहेत अशी माहिती सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी दिली आहे.
