वसई:- वसई-विरार शहर परिसरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून श्वानदंशाच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. नुकताच नालासोपाऱ्यात रेबीजमुळे एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. याशिवाय श्वान दंश होण्याच्या घटना ही सातत्याने समोर येत असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने श्वानप्रेमी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची विशेष बैठक घेऊन श्वानांच्या नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
गुरुवारी महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत नागरिकांनी आणि श्वानप्रेमींनी प्रशासनासमोर समस्यांचा पाढा वाचला. सध्या शहरात कार्यान्वित असलेली दोन निर्बीजीकरण केंद्रे अपुरी असून, तिथे होणारे कामही समाधानकारक नसल्याची तक्रार करण्यात आली.काही नाही श्वान निर्बीजीकरणासाठी नेले जातात मात्र त्यांचे नक्की निर्बीजीकरण होते का की पुन्हा तसेच आणून सोडून दिले जाते असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. जर निर्बीजीकरण होत असल्याचा दावा केला जातो तर उपद्रव कसा वाढतो असा सवाल ही नागरिकांनी केला.
श्वानांची वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बीजीकरण केंद्रात वाढ करणे, श्वानांसाठी रुग्णवाहिका, विशेष रुग्णालय आणि निवारा केंद्र उभारणे, रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक व्यापक करणे, श्वानांसाठी फीडिंग झोन निश्चित करणे आणि मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र दफनभूमीची व्यवस्था करणे अशा प्रमुख मागण्या शहरातील नागरिक व श्वानप्रेमींनी केल्या आहेत.
नवीन निविदा प्रक्रियेला सुरुवात
शहरातील वाढती समस्या लक्षात घेता, महापालिकेने नवीन निर्बीजीकरण केंद्र उभारण्यासाठी ‘स्वारस्य अभिरुची’ (ईओआय) तत्त्वावर निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातबश्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण, आहार आणि आरोग्य देखरेख करणे अशा बाबी नमूद आहेत. आतापर्यंत तीन निविदा आल्यात त्यातील एका निविदाधारकाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे असे महापालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले आहे.सध्या नवघर (वसई) आणि कशिद कोपर (विरार) येथे दोन केंद्रे असून त्यांची क्षमता ३४० आहे.त्या ठिकाणी श्वानांचे निर्बीजीकरण सुरू आहे असेही महापालिकेने सांगितले आहे. याशिवाय श्वानांसाठी खानपानासाठीच्या जागा ही निश्चित केल्या आहेत असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पाच वर्षांतील आकडेवारीवर एक नजर
निर्बीजीकरण: २८,६६६ श्वान (खर्च: ४ कोटी ४६ लाख रुपये).
लसीकरण: ४४,४०७ श्वान.
उपचार: १,८६० पिसाळलेल्या श्वानांवर उपचार.
धक्कादायक वास्तव: केवळ चालू वर्षात (जानेवारी ते एप्रिल) तब्बल १५,३४८ श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत.
भटक्या श्वानांचा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मार्ग काढला जाईल. बैठकीत आलेल्या सर्व सूचना आणि मागण्यांची पूर्तता करण्यासाठी महापालिका सकारात्मक पावले उचलत आहे. :- मार्शल लोपीस, उपमहापौर, वसई-विरार महापालिका.
