वसई: वसई विरार शहरातील भटक्या आणि जखमी श्वानांची वाढती संख्या आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश यामुळे महापालिकेकडून श्वान निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, या मोहिमेंतर्गत महापालिकेकडून केवळ २० हजार श्वानांचे निर्बीजीकरण तर ४१ हजार श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले आहे.
वसई विरार शहरात गेल्या काही काळात श्वानदंशाच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये वृद्ध, महिला आणि मुख्यत्वे लहान मुले बळी ठरली आहेत. तर गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयानेही श्वनांचा उपद्रव रोखण्यासाठी बसथांबे, रेल्वे स्थानक, विमानतळ, सरकारी कार्यालये अशा विविध ठिकाणी आढळणाऱ्या श्वानांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते. तर चालू वर्षात जून महिन्यापर्यंत
तसेच सर्व महापालिकांना श्वान निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वसई विरार महापालिकेकडून मिशन रेबीज या संस्थेसह रेबीज नियंत्रण मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, या मोहिमेंतर्गत दोन वर्षात केवळ २० हजार ८५१ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. तर ४१ हजार ६०१ श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले आहे.
यापैकी वर्ष २०२४-२५ केवळ ४ हजार १४१ श्वानांचे निर्बीजीकरण आणि ६ हजार ९७८ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. तर २०२५-२६ या वर्षात १५ हजार ४६ श्वानांचे निर्बीजीकरण १८ हजार ४५२ श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले आहे. तर चालू वर्षात जून महिन्यापर्यंत ८६४ श्वानांचे निर्बीजीकरण तर १ हजार ४३० श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले आहे. तर मिशन रेबीज या संस्थेमार्फत गेल्या वर्षभरात १४ हजार ७४१ श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले आहे.
विशेष श्वान निर्बीजीकरण केंद्र
वसईतील नवघर आणि विरारमधील काशीद कोपर अशा दोन ठिकाणी श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. मात्र, याला अधिक गती देण्यासाठी प्रभाग समिती डी नवघर पूर्व येथे हद्दीतील मोकाट व जखमी श्वानांवर उपचार करण्यासाठी एक विशेष श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात तज्ज्ञ अभिकर्त्याची (एजन्सी) नेमणूक करण्यात आली असून, भटक्या व जखमी श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, रेबीज लसीकरण आणि उपचार केले जात आहेत.
