वसई: वसई विरार शहरातही वाढत्या तापमानाचा तडाखा लोकांना बसू लागला आहे. त्यामुळे आता रस्त्याच्याकडेला झाडाच्या सावलीत रसाळ आणि गोड असे ताडगोळे विकणाऱ्या विक्रेत्यांकडे नागरिकांची पावले वळू लागली आहेत. तसेच ताडगोळ्यांच्या विक्रीतून ग्रामीण भागातील विक्रेत्यांना हंगामी रोजगाराची संधीही निर्माण झाली आहे.

होळी संपताच मुंबई, ठाण्यासह वसई विरार शहरातही हळू हळू उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यामुळे अगदी सकाळपासूनच सूर्यनारायण कोपत असल्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. तर, शरीराची होणारी काहिली कमी करण्यासाठी अनेकजण ऊसाचा रस, शहाळी आणि कैरीच्या पन्हाचा आधार घेत आहेत. मात्र, त्यातही सध्या पांढऱ्या शुभ्र, मऊ आणि चवीला गोड ताडगोळ्यांनी पर्यटकांना आणि स्थानिकांना भुरळ घातली आहे.

ताडगोळे हे शरीराला शीतलता देणारे आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी असल्यामुळे उन्हाळी फळ म्हणून ओळखले जातात. त्यांना ‘आईस ऍपल’ असेही म्हटले जाते. मार्च आणि एप्रिल महिन्यात ताडगोळ्यांची मागणी आणि विक्री सर्वाधिक असते. त्यामुळे वसई विरार शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, पर्यटनस्थळे अशा विविध ठिकाणी ताडगोळे विक्रेते दिसून येत आहे.

वसईच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्यांची झाडे आहेत. त्यामुळे थेट ताडमालकाकडून किंवा घाऊक बाजारातून ताडफळ विकत घेतले जाते आणि त्यानंतर ताडफळ फोडून त्यातले ताडगोळे विकले जातात. सध्या १०० ते १२० रुपयांना डझनभर ताडगोळे या दराने ताडगोळ्यांची विक्री केली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासी बांधवांना दोन ते तीन महिन्यांसाठी हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

पर्यटकांचे खास आकर्षण
वसई-विरारमधील पर्यटनस्थळांवर मुंबई आणि उपनगरांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या पर्यटकांच्या पसंतीमुळे ताडगोळ्यांच्या विक्रीला अधिकच प्रोत्साहन मिळत आहे. महामार्ग, समुद्र किनाऱ्यांकडे जाणारे रस्ते, महामार्ग असा विविध ठिकाणी पडलेले ताडफळांचे ढीग आणि ते फोडण्याची कसब पाहण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहेत.

“सध्या गरमी वाढल्याने ग्राहकांकडून ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे. ही फळे लांबून आणावी लागत असल्याने वाहतुकीचा खर्च वाढतो, तरीही मागणी अधिक असल्याने सर्व खर्च वजा जाता दिवसाकाठी ६०० ते ९०० रुपयांपर्यंत नफा होतो. उन्हाळ्याचे हे दोन महिने आमच्या कुटुंबासाठी रोजगाराचे साधन ठरतात.”

-विजू भंडारी, ताडगोळे विक्रेते, विरार