वसई: उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर यासह अन्य भागातील महापालिकेच्या क्षेत्रात पाणी कपातीचे धोरण अवलंबले आहे. असे असतानाच वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाच्या धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक आहे. अजूनही चार महिने पुरेल इतका जलसाठा धरणात शिल्लक आहे.

​वसई-विरार शहराला सुर्या (धामणी), उसगाव आणि पेल्हार अशा धरणांतून सद्यस्थितीत ४०० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा होत आहे. सर्वाधिक पाणी हे सुर्या योजनेच्या विविध प्रकल्पातून उपलब्ध होत आहे. उन्हाच्या तीव्र झळा जरी बसत असल्या तरी वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तिन्ही धरणात पाण्याची पातळी चांगल्या स्थितीत आहे.

अगदी वसई विरार शहराला लागूनच असलेल्या मिरा भाईंदर, मुंबई, ठाणे यासारख्या भागात पाण्याची समस्या जाणवत आहे. भविष्यात ही समस्या अधिक तीव्र होऊ नये यासाठी काही ठिकाणी पाणी कपात करण्यात येत आहे. मात्र वसई विरार शहरात यंदाच्या वर्षी कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आली नसल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण म्हणजे सुर्या धरण त्यातील जलसाठा सद्यस्थितीत १५ जुलै नंतर ही जवळपास ८२ दिवस पुरवठा होऊ शकतो इतका आहे. तर अन्य दोन तर धरणात १५ जुलै नंतर २६ दिवस पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणी साठा मुबलक असल्याने शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात लागू केली नसल्याचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी जाहीर केले होते. असे जरी असले तरी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

​धरणांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती:

​धामणी धरण: एकूण २७६ दशलक्ष घनमीटर साठ्यापैकी सध्या ८०.१८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा १५ जुलै नंतरही पुढील ८२ दिवस पुरेल इतका आहे.

​उसगाव धरण: ४.९६ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी सध्या २.०४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून १५ जुलै नंतर २६ दिवस पुरेल

​पेल्हार धरण: ३.५६ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी सध्या ०८५८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असून १५ जुलै नंतर २७ दिवस पुरेल

मागील वर्षी लांबलेल्या पावसाचा परिणाम

२०२५ मध्ये पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. या पावसामुळे वसई विरार सह जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांच्या भागात पूरस्थितीची समस्या निर्माण झाली होती. तेव्हा पाणी पुरवठा करणारी धरण ही तुडूंब भरली होती. याशिवाय सप्टेंबर अखेरीस पावसाळा हा संपुष्टात येत असतो. मात्र नोव्हेंबर पर्यँत अधूनमधून झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी टिकून राहिली आहे.

तर दुसरीकडे मिरा भाईंदर शहराला एमएमआरडीएच्या सुर्या योजनेतून २१८ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा याच धरणातून मंजूर आहे. परंतु मिरा भाईंदरकडे जाणाऱ्या जलवाहिन्या अजूनही कार्यान्वित न झाल्याने पाण्याची होणारी अपेक्षित उचल ही थांबली आहे. त्यामुळे ही धरणातील साठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे.