वसई : विरार रेल्वे स्थानक परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर मालवाहू गाड्या थांबवून माल उतरवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे परिसरात भीषण वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली असून, रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना सायंकाळच्या गर्दीच्या वेळी याचा मोठा फटका बसत आहे.
विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांवरून हलक्या व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र अलीकडच्या काळात मुख्य रस्त्यांवर मालवाहू वाहने थांबवून, त्यातून माल उतरविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
यामुळे रस्त्यावर उभी असलेली वाहने आणि दुकानदारांचा रस्त्यावर वाढलेला पसारा यामुळे नागरिक व प्रवाशांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी मालवाहू गाड्या उभ्या करणे आणि त्यातून माल उतरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने संध्याकाळी गर्दीच्यावेळी रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच रिक्षांच्या अनियमित रांगा, दुचाकींची गर्दी आणि पादचाऱ्यांची वर्दळ यामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.
या वाहतूक कोंडीबाबत बोलताना, काही मिनिटांचा प्रवास पार करण्यासाठी सध्या दहा ते पंधरा मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तर माल उतरवण्यासाठी दुकानदारांकडे स्वतंत्र जागा नसल्यामुळे याचा परिणाम थेट आमच्या दैनंदिन प्रवासावर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत संबंधित ठिकाणच्या कर्मचाऱ्याला सांगून ठिकाणी कारवाई केली जाईल असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात येत आहे.
रिक्षाचालकांची मनमानी
मालवाहू वाहनांसोबतच रिक्षाचालकांची मनमानीही वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहे. रिक्षांचे अनियमित पार्किंग, जबरदस्तीने प्रवासी पकडणे आणि मार्ग अडवणे यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
