वसई:- वसई विरार मधील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी व दळणवळण करण्याचे मार्ग सुखकर व्हावेत यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून विरार आणि नालासोपारा स्थानकापर्यँतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व विराटनगर व ओसवालनगरी येथील रेल्वे उड्डाणपुलांची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत.नुकताच आमदार राजन नाईक आणि एमएमआरडीएच्या अधिकारी यांच्या सोबत पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे दळणवळण करण्याचे मार्ग ही आता अपुरे पडत असून नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने विविध मार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातून तोडगा काढण्यात यावा अशी मागणी नागरीक सातत्याने करीत आहेत. याच अनुषंगाने एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपूल उभारणी, रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण असे विविध कामे नियोजित करण्यात आली आहेत.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांना एमएमआरडीए'च्या माध्यमातून वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल यांच्याकडे एमएमआरडीए’च्या वसई व पालघर परिसराची धुरा सोपविली आहे. नुकताच मुंबईत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल, आमदार राजन नाईक , भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, एमएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता चेतन बेंडाळे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र शेवाळे, महापालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक पार पडली.

या बैठकीत वसई-विरार महापालिका क्षेत्रातएमएमआरडीए’कडून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महामार्गावरून येणाऱ्या दोन्ही काँक्रीट रस्त्यांबाबत महापालिकेने खर्चाचा निश्चित आराखडा सादर करावा. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती रुबल अगरवाल यांनी दिली. दोन काँक्रीट रस्ते आणि विराटनगर व ओसवालनगरी उड्डाणपुलाची कामे `एमएमआरडीए’कडून प्राधान्याने केली जातील, अशी ग्वाही रुबल अगरवाल यांनी दिली.

सहा ट्रॅफिक जंक्शन उड्डाणपुलांनाही चालना

गोखिवरे, चंदननाका जंक्शन, मनवेलपाडा नाका ते फुलपाडा जंक्शन, माणिकपूर ते बाभोळा नाका, वसंत नगरी ते एव्हरशाईन आणि नारिंगी (साईनाथनगर) येथील ट्रॅफिक जंक्शन पुलांच्या कामांबाबत महापालिकेने खर्चाचा नवा सुधारित अंदाज सादर करावा, असे निर्देश रुबल अगरवाल यांनी दिले आहेत असे भाजपचे मनोज बारोट यांनी सांगितले आहे.