वसई: शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी आणि स्वच्छता जनजागृतीसाठी महापालिकेने तृतीयपंथी आणि महिला बचत गटांची ‘क्लिनअप मार्शल’ म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय वसई विरार महापालिकेने घेतला आहे. तृतीयपंथीयांची क्लीनअप मार्शल म्हणून नियुक्ती करणारी वसई विरार ही मुंबई महानगर क्षेत्रातील पहिलीच तर राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे.
वसई विरार महापालिकेकडून नियुक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरात दररोज स्वच्छता केली जाते. मात्र, असे असले तरी अनेक ठिकाणी नागरिक पुन्हा कचरा टाकून अस्वच्छता पसरवतात. तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर व सार्वजनिक थुंकणे, कचरा फेकणे, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर टाकणे, रस्त्याच्याकडेला कचरा जाळणे, त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर यामुळे रोगराई पसरू नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
त्यामुळे घनकचरा अधिनियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पालिकेने कंत्राटदारानऐवजी स्वतः क्लीनअप मार्शल नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत महापालिकेने तृतीयपंथीयांच्या संस्था आणि महिला बचत गटांना हे काम देण्याचा ठराव नुकताच महासभेत बहुमताने मंजूर केला. शहरात सिग्नल किंवा रेल्वे स्थानकांवर भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथीयांना सन्मानपूर्वक रोजगाराची संधी देऊन सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे अशी प्रतिक्रिया महापौर अजीव पाटील यांनी दिली आहे.
९ प्रभागात प्रायोगिक तत्वावर नियुक्ती
वसई-विरारमधील सर्व ९ प्रभागांमध्ये या मार्शलची नियुक्ती केली जाईल. हा उपक्रम २०२६-२०२७ ते २०२८-२०२९ या आगामी तीन वर्षांसाठी असून, तृतीयपंथीयांसाठी सुरुवातीला एक वर्षाच्या प्रायोगिक तत्त्वावर हे काम दिले जाईल. तृतीयपंथीयांच्या नोंदणीकृत संस्थांना यात सहभागी होता येईल व सर्व सदस्यांना महापालिकेकडून विशेष प्रशिक्षण दिले जाईल. कामादरम्यान गणवेश, ओळखपत्र आणि सुरक्षा साहित्य वापरणे अनिवार्य राहील. या निर्णयामुळे शहराची स्वच्छता सुधारेलच, शिवाय तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाचे स्थान मिळेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
तृतीयपंथी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचा ही योग्य प्रकारे उदरनिर्वाह होण्याच्या दृष्टीने महापालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. क्लीन-अप मार्शल नियुक्तीच्या निविदेत तृतीयपंथीयांसाठी ३३% प्राधान्य दिले असून, उर्वरित जागांवर महिला बचत गट व इतरांना संधी मिळेल. सर्व नियुक्त्या पात्रतेचे निकष तपासून अत्यंत पारदर्शकपणे केल्या जातील. असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले आहे.
यापूर्वी पिंपरी- चिंचवड व ओडिशाच्या महापालिकेतही नियुक्ती
तृतीयपंथीयांना महापालिकेच्या कामकाजात सामावून घेण्याचा सर्वात पहिला उपक्रम ओडिशा राज्यातील कटक महानगरपालिकेने २०१९ साली राबविला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जुलै २०२२ मध्ये तृतीयपंथीयांना ग्रीन मार्शल आणि सुरक्षा रक्षक म्हणून पालिकेच्या सेवेत समाविष्ट केले होते. महाराष्ट्रातील तृतीयपंथी समुदायाला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात संधी देण्याचा राज्यातील हा पहिला प्रयोग ठरला होता.
