वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची उभ्या टँकरला जोरदार धडक लागून भीषण अपघात घडला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वसई पूर्वेच्या एव्हरशाईन रस्त्यावर घडली. या जोराच्या धडकेमुळे बसमधील १५ हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडून शहरातील विविध मार्गांवर बससेवा पुरविली जाते. मंगळवारी सकाळी वसई स्टेशन ते वसई फाटा ही बस सेवा सुरू असताना, गाडी एव्हरशाईन येथे पोहोचताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याकडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की बसमधून प्रवास करणाऱ्या ३० पेक्षा अधिक प्रवाशांना मोठा हादरा बसला.
चालकाने समोरील टँकरला जोरात धडक दिल्याने प्रवाशांचे तोंड, नाक आणि डोके पुढच्या सीटवर आपटून ते जखमी झाले, अशी माहिती प्रवाशांनी दिली. तसेच, हा अपघात वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचा गंभीर आरोपही प्रवाशांनी केला आहे.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार पालिकेच्या परिवहन सेवेतील गाड्यांची स्थिती आणि चालकांचा बेफिकिरपणा यांमुळे प्रवाशांच्या जिवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावर उभ्या वाहनाला बस धडकल्याने महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थेवर आणि चालकांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
