वसई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेकडून शहरात वृक्षछाटणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, ही छाटणी शास्त्रोक्त आणि योग्य पद्धतीने न करता अतिशय विचित्र पध्दतीने केली जात असल्याने शहरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिप ते आगाशी या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा महापालिकेने लावलेली झाडे आता बहरली असून परिसराचे सौंदर्य वाढवत आहेत. परंतु, गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानी आणि जाहिरात फलकांना (बॅनर) बाधा ठरणाऱ्या या वृक्षांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली त्यांची सर्रास कत्तलच केली जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
एकीकडे महापालिका व प्रशासन नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे गणेशोत्सवाच्या आड येणाऱ्या जाहिरात फलकांसाठी हिरव्यागार झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. गोकुळ टाऊनशीप ते प्रकृती रुग्णालयाच्या दरम्यान असणारी झाडे ही उंचीने कमी असून ती रस्त्याच्या एका कडेला आहेत. त्यांच्या फ़ांद्याही आकाराने लहान आहेत. असे असताना देखील या झाडांच्या फ़ांद्या कापण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे पालिकेच्या कारभारावर नागरिकांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत. निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या वृक्षांची विनाकारण आणि अतिरिक्त छाटणी केल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
वृक्षप्राधिकरणाच्या नियमांनुसार झाडांची छाटणी करताना ती ठराविक पद्धतीने आणि शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून करणे बंधनकारक असते. मात्र, विरारमध्ये ज्या अयोग्य आणि असंतुलित पद्धतीने फांद्या तोडल्या जात आहेत, त्यामुळे भविष्यात ही झाडे एकाच बाजूला झुकून मुळासकट कोसळण्याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः चुकीच्या पद्धतीने वृक्ष छाटणी केल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्याने या झाडांचा समतोल बिघडून ती उन्मळून पडण्याचा धोका अधिक असतो.
केवळ जाहिरातदार आणि राजकीय कमानींचे फलक स्पष्ट दिसावेत यासाठी हिरव्यागार झाडांचा बळी देणे हा अत्यंत बेजबाबदारपणा आहे. त्यामुळे या चुकीच्या पद्धतीने वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
याबाबत महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाकडे विचारणा केली असता ज्या ठिकाणी झाडांची छाटणी झाली आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. ती छाटणी खरंच आवश्यक होती का ? अशा सर्व बाबी तपासल्या जातील. जर केवळ जाहिरातीच्या उद्दिष्टाने झाली असेल तर निश्चित त्यावर कारवाई केली जाईल असे महापालिकेच्या उपायुक्त ( वृक्ष प्राधिकरण) स्वाती देशपांडे यांनी सांगितले आहे.
