वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका पाठोपाठ एक अशा अपघाताच्या घटना समोर येत आहे. रविवारी सकाळी पेल्हार येथे साडे नऊच्या सुमारास भरधाव ट्रकची रिक्षाला धडक लागून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आठवडा भरातील ही दुसरी अपघाताची घटना आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मागील काही वर्षांपासून या मार्गावरील वर्दळ वाढली आहे. या वाढत्या वर्दळीमुळे सातत्याने अपघाताच्या घटना ही समोर येत आहेत. रविवारी सकाळी साडे नऊ च्या सुमारास पेल्हार पेट्रोल पंप जवळ गुजरात वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षापूर्णपणे दबली गेली असून त्यात बसलेले पिता पुत्र गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. शेहजाद गुलाम उस्मानी (५२) आणि अतिफ शेहजाद उस्मानी (२२) अशी मृत्यू झालेल्या पिता पुत्रांची नाव आहेत. दोघेही पेल्हार गावात राहत होते. कामानिमित्त ते स्वतःची रिक्षा घेऊन मुंबई निघाले होते. अवघ्या काही अंतरावर पोहचताच त्यांचा अपघात घडला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी सांगितले आहे. चालकाला ताब्यात त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोघांच्या अपघाती मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आठवडा भरातील हा दुसरा भीषण अपघात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे. यापूर्वी पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नालासोपारा फाटा येथे कंटेनरचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि थेट हा कंटेनर कठडा तोडून खाली उलटला. हा कंटेनर खाली उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळला असल्याने यात डहाणू येथील अंजली जिग्नेश दुबला (३८) या महिलेचा मृत्यू झाला होता तर चार जण जखमी झाले होते. आता रिक्षातून प्रवास करणारे पिता पुत्र यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा महामार्ग एकप्रकारे मृत्यूचा सापळा तयार होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

विचित्र अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

पेल्हार पेट्रोल पंपाजवळ रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या विचित्र अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत. यात ट्रकची धडक इतक्या जोराची होती की त्यात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. त्यामुळे पिता पुत्र यांचा मृत्यू झाला. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला असल्याचा आरोप पेल्हार येथील रहिवाश्यांनी केला आहे.