वसई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वसई विरार शहरात लवकरच मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. यासाठी बीएलओमार्फत मतदारांच्या मॅपिंगचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यासाठी तातडीने मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचे जाहीर आवाहन केले महापौर अजीव पाटील यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण करून ती अचूक बनवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला एसआयआर म्हणजे मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम म्हटले जात असून एसआयआरसाठी आयोगाने ३ डिसेंबर २००२ ची मतदार यादी हा आधार निश्चित केला आहे. ३० ऑक्टोबर २०२४ ची विधानसभेतील मतदार यादी ही अंतिम धरण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सध्याच्या मतदार यादीची २००२ च्या यादीशी जुळवणूक (मॅपिंग) करण्याचे काम सुरू आहे. हे काम ब्लॉक लेव्हल ऑफिसर मार्फत (बीएलओ) केले जात आहे.
वसई विरार शहरातही या मोहिमेला लवकरच सुरुवात होणार आहे. बीएलओमार्फत मतदारांच्या मॅपिंगचे काम केले जाणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक मतदाराने आपले स्वतःचे नाव २००२ च्या मतदार यादीत होते की नाही, याची सर्वप्रथम तपासणी करून खात्री करणे बंधनकारक आहे. ज्या नागरिकांची नावे २००२ च्या मतदार यादीत समाविष्ट नव्हती, त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कोणाही एकाची २००२ सालची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक आहे.
या माहितीत प्रामुख्याने संबंधित व्यक्तीचे संपूर्ण नाव, २००२ च्या यादीत नाव असलेले राज्य व जिल्हा, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक या सर्व तपशीलांचा अचूक समावेश असणे गरजेचे आहे. तसेच, विवाहित महिलांनी ही प्रकिया पूर्ण करताना एक विशेष बाब लक्षात ठेवायची आहे की, त्यांनी त्यांच्या सासरच्या व्यक्तींची नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या आई किंवा वडिलांची २००२ सालची वरील सर्व सविस्तर माहिती बीएलओकडे जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सदर मॅपिंगची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे प्रत्येक मतदारासाठी अत्यंत अत्यावश्यक आहे. जे मतदार आपले मॅपिंग करून घेणार नाहीत, त्यांचे नाव आगामी मतदार यादीतून कायमचे वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने या प्रक्रियेत दिरंगाई न करता, थेट आपल्या परिसरातील बीएलओला प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे संपर्क साधून तातडीने चौकशी करावी. लोकशाहीच्या या प्रक्रियेत आपले योगदान महत्त्वाचे असून, प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून आपले मॅपिंग त्वरित पूर्ण करावे आणि आपले मतदान सुरक्षित करावे, असे आवाहन महापौर अजीव पाटील यांनी नागरिकांना केले आहे .
