वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन बस सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन दिल्याने कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या सणात हे आंदोलन पुकारल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवासी वर्गाला बसला आहे.
वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून बस सेवा पुरविली जाते. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १२० बसेस असून ३८ मार्गांवर ही सेवा दिली जात आहे. तसेच यात ४० ई-बसेसचा समावेश आहे. दिवसाला सुमारे २२०० फेऱ्या होत असून त्यातून ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात.परिवहन सेवेत काम करणाऱ्या चालक व वाहकांनी ११ ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यावेळी वेतनवाढ यासह अन्य मागण्या मान्य करत त्यावर तोडगा काढण्यात आला होता. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
मात्र, ऐन गणेशोत्सवाला प्रारंभ होत असतानाच पुन्हा एकदा परिवहन बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. “गणेशोत्सव तोंडावर असताना ठेकेदाराने आम्हाला महिनाभराचे पूर्ण वेतन देण्याऐवजी निम्मेच वेतन दिले आहे,” असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. “सणासुदीचा काळ असल्याने आम्हालाही खर्च आहे, आमचाही सण आहे. आम्ही पूर्ण महिना काम करतो, मग अपुरे वेतन दिले तर आम्ही आमचा संसार कसा चालवायचा?” अशी संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका दैनंदिन परिवहन बसने प्रवास करणारे नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. बससेवा बंद असल्यामुळे कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. विशेषतः आता गणेशोत्सव सुरू होत असल्याने अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडत आहेत; मात्र बस बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
”बस सेवा पूर्ववत व्हावी यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. संबंधित ठेकेदाराला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा काढून सेवा तात्काळ सुरू करावी, अशा सूचना दिल्या आहेत,” असे परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी सांगितले.तर परिवहन सेवेचे आगार व्यवस्थापक किरण शेरेकर यांच्याकडे विचारणा केली असता, “महापालिकेकडून विविध योजनांची देयके मिळालेली नाहीत. निधी नसल्याने अडचणी येत असतात. तरीही आम्ही कर्मचाऱ्यांना वेतन दिले आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.सकाळपासून एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
