वसई :- वसई विरार महापालिकेकडूनही विशेष एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत १४ वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण केले जात आहे. मात्र या मोहिमेला अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत केवळ १ हजार २२७ मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ८ मार्च २०२६ रोजी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात झाली. याच अनुषंगाने वसई-विरार महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील १४ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस दिली जात आहे.
एचपीव्ही म्हणजे ‘हयुमन पॅपिलोमाव्हायरस’ हा एक अत्यंत सामान्य विषाणू आहे. मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) चे १०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यामागे ९५ टक्क्यांहून अधिक प्रकाणामध्ये या विषाणूचा संसर्ग कारणीभूत आढळतो. किशोरावस्थेत ही लस घेतल्यास भविष्यातील धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
महापालिकेने ही मोहीम सुरू केली होती. तीन महिन्यात महापालिकेच्या क्षेत्रात १ हजार २२७ इतक्या मुलींचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जनजागृतीचा अभाव
पालकांमध्ये या लसीबाबत असलेली अनास्था किंवा माहितीचा अभाव हे या अल्प प्रतिसादाचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. भविष्यातील गंभीर आजारापासून आपल्या मुली सुरक्षित राहाव्यात, यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन पालिकेच्या या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
