वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरूच असून, बुधवारी महापालिका मुख्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. ठेकेदाराकडून वेळेवर आणि पुरेसे वेतन न मिळणे, तसेच वेतनातून केली जाणारी बेकायदेशीर कपात यामुळे त्रस्त झालेल्या बस चालक आणि वाहकांनी शनिवारपासून अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारले.
महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात झालेल्या दीर्घ बैठकीनंतरही कोणताही तोडगा निघू शकला नाही. ठेकेदाराकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सलग पाचव्या दिवशी परिवहन सेवा ठप्प झाल्याने वसई-विरारमधील सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशांना ऑटो रिक्षांसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. अनेक ठिकाणी रिक्षा मिळवण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे, तर काही भागात वाहने उपलब्ध नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या टोलवाटोलवीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांचा ठेकेदार हटावचा नारा
कर्मचाऱ्यांना केवळ थकीत वेतनाचाच प्रश्न नाही, तर त्यांना नियमानुसार किमान वेतनही दिले जात नाही. त्यातच वाहनांच्या लहान-मोठ्या दुरुस्तीचा खर्चही चालक आणि वाहकांच्या पगारातून कापला जात असल्याचा धक्कादायक आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. याशिवाय, आजारपण किंवा घरगुती आपत्कालीन प्रसंगी घेतलेल्या रजेचेही पैसे कापले जातात आणि कोणतीही रजा मंजूर केली जात नाही. अशा विविध अन्यायकारक अटींमुळे कर्मचारी प्रचंड असंतोषात असून, आता केवळ थकबाकी मिळणे पुरेसे नसून संबंधित कंत्राटदाराची हकालपट्टी करून नवा कंत्राटदार आणावा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी प्रशासनासमोर मांडली आहे.
