वसई :- वसई विरार महापालिकेच्या कचराभूमीवर साचून राहिलेल्या कचऱ्यावर बायोमायनींग करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वसई विरार शहरात दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. शहरात गोळा होणारा कचरा वसई पूर्वेच्या गोखीवरे मधील भोयदापाडा येथील कचरा भूमीवर नेऊन टाकला जातो.

शहरातून दिवसाला ८०० ते ८५० मेट्रिक टन इतका कचरा निघतो. या कचऱ्याचे वर्गीकरण होऊन त्याची विल्हेवाट लागणे आवश्यक आहे. यापूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प नसल्याने वर्षानुवर्षे कचरा साचून राहत होता. त्यामुळे जवळपास १५ लाख मेट्रिक टन कचरा साचून होता.

दोन वर्षापूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मे. साई युटिलिटी या संस्थेला वीस वर्षांसाठीचा ठेका देण्यात आला होता. मात्र कचरा विल्हेवाट प्रक्रियेत दिरंगाई करणे, ट्रामल यंत्र वाढविण्यास नकार देणे अशा विविध कारणांमुळे महापालिकेचे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकत ठेका रद्द केला.

ठेका रद्द झाल्याने १४ वर्षांनंतर कचरा भूमीवर सुरू झालेला बायोमायनींग प्रकल्प आता ठप्प झाला आहे. नवीन ठेकेदार नियुक्त होईपर्यँत येथील कचरा विल्हेवाट प्रक्रिया ठप्प राहणार असल्याने पुन्हा एकदा महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन कोलमडले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

कचऱ्याचा त्रास हा सर्वाधिक त्या ठिकाणच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. यासाठी येथील दुर्गंधीयुक्त ढिगारे कमी करण्यासाठी पालिकेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे (ठाकरे गट) उपतालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी सांगितले आहे. काही ठिकाणी हा कचरा नागरिकांच्या घरापर्यँत येऊ लागला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

तर नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठेकेदार नियुक्त होताच कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली जाईल असे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ठेकेदाराची न्यायालयात धाव

मे. साई युटिलिटी या संस्थेचा ठेका रद्द केल्याने ठेकेदाराने ही न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत कचरा विल्हेवाट प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केवळ पाच लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

१५ लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २ वर्षांची मुदत ठेकेदाराला दिली होती. मात्र, ठेकेदाराकडून कचरा विल्हेवाट प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे निम्म्या कचऱ्यावर ही प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. वर्षभरात केवळ ५ लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे उर्वरित कचऱ्याचे ढिगारे कचराभूमीत तसेच पडून आहेत.

शास्त्रोक्त विल्हेवाटीचा अभाव

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार कचऱ्याचे विलगीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, वसईत ओला आणि सुका कचरा एकत्रितपणेच उचलला जातो. यामुळे पुनर्प्रक्रिया करणे अशक्य होते आणि संपूर्ण कचरा कचराभूमीवर पडून राहतो. पालिकेकडे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक संयंत्रे उपलब्ध असूनही, ती कार्यान्वित नसल्याने कचरा व्यवस्थापनाचे संपूर्ण गणित बिघडले आहे.

तसेच उघड्या वाहनातून केली जाणारी कचऱ्याची वाहतूक, कचरा कुंड्यांच्या अभावामुळे जागोजागी जाळला जाणारा कचरा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा अभाव अशा विविध कारणांमुळे शहरातील पर्यावरण आणि वातावरणावर याचा परिणाम होत आहे.