वसई: वसई विरार शहरातील पाणी प्रश्न मार्गी लागावा यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. पालघर जिल्ह्यात कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या मार्फत उभारण्यात येत असलेल्या देहरजी धरण प्रकल्पातून शहराला प्रतिदिन १९० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. महाकालिकेकडून प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला जात असून पाण्याचे वितरण शहरापर्यंत व्हावे या दृष्टीने सल्लागार नियुक्त करून आराखडा तयार करण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत शहराला सूर्या योजनेच्या धामणी व कवडास, उसगाव, पेल्हार या तीन धरणातून २३० दशलक्ष लीटर तर एमएमआरडीएच्या सुर्या प्रकल्पातून मंजूर १८५ दशलक्ष लीटरपैकी १७० दशलक्ष लीटर असा एकूण ४०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रतिदिन होतो.
शहराची वाढती लोकसंख्या आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची तूटही मोठी आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी मिळत नाही. भविष्यात वाढत जाणाऱ्या लोकसंख्या यामुळे पाण्याची गरज अधिकच भासणार आहे. पालघर जिल्ह्यातील देहरजी नदीवर देहरजी मध्यम प्रकल्पा हाती घेण्यात आला आहे.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून (केआयडीसी) या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. तर केआयडीसी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पास आर्थिक मदत केली जात आहे. यासाठी केआयडीसी आणि एमएमआरडीएमध्ये करार झाला असून या करारानुसार एमएमआरडीएने २५९९.१५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. या उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातून वसई विरार महानगरक्षेत्रासाठी प्रतिदिन १९० दशलक्ष लीटर पाणी हे राखीव ठेवण्यात आले आहे.
एकीकडे प्रकल्पाचे काम ही आता अंतिम टप्प्यात आल्याने त्या धरणापासून ते शहरापर्यँत पाण्याचे वितरण व्हावे यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी एमएमआरडीएकडून मे. डी. आर. ए. या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या कंपनीमार्फत जलवाहिन्या वितरण प्रणाली विकसित करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. तर महापालिकेकडून या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी दिली आहे.
२०३० ला होणार पाणीपुरवठा
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून आतापर्यंत देहारजी प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. तर २०२७ पर्यंत देहरजी धरणाचे काम करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहेत. पण, असे असले तरी एमएमआरडीएकडून नियुक्त सल्लागार कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या आराखड्यानुसार वितरण प्रणाली विकसित करण्यासाठी २०३० उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
जलवाहिन्यां असूनही पाणीपुरवठा अपुराच
वसई विरार शहराला सद्यस्थितीत एमएमआरडीएच्या सुर्या योजनेतून प्रतिदिन १८५ दशलक्ष लीटर इतके अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. यासाठी पालिकेकडून जलवाहिन्यादेखील अंथरण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. खासकरून ग्रामीण भागात ही समस्या गंभीर असल्यामुळे जलवाहिन्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. तर ज्या ज्या भागात जलवाहिन्यांची कामे पूर्ण होत आहेत. त्यानुसार पाणी पुरवठा हळूहळू सुरू केला जात आहे, असेही महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
