वसई:- सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा शहरातील दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होऊ लागला आहे. मागील चार दिवसांपासून मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
वसई विरार शहराला ४०० दशलक्ष लीटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत सूर्या टप्पा १, ३ आणि एमएमआरडीएच्या योजनेतून शहराला एकूण ३५० दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते. पण, ४ ते १० एप्रिल दरम्यान मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाकडून सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी शटडाऊन घेतला आहे. या कामामुळे शहरात जवळपास १५० दशलक्ष लीटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे.
मागील चार दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणच्या भागात पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील भागात जे काही पाणी सोडले जाते ते खुपच अपुरे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
विरार फुलपाडा सहकार नगर भागात चार दिवसांपासून पाणी आले नाही. पाण्यासाठी खोदलेली बोअरवेल आहे ती सुद्धा नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे अडचणी अधिकच वाढल्या असल्याचे येथील रहिवासी संतोष तिवारी यांनी सांगितले सांगितले आहे. मनवेलपाडा कारगिल नगर भागातही चार दिवसांपासून पाण्याची समस्या जाणवत आहे. पाणी आज येईल, उद्या येईल अशा स्वरूपाची उत्तरे आम्हाला मिळत असल्याचे अजय परब यांनी सांगितले आहे. आता अधिकचे पैसे देऊन टँकर मागवावे लागत आहे असेही त्यांनी सांगितले.
