वसई: एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. वसई विरार महापालिकेने अजूनही पाणी कपात लागू केली नाही. दिवाळीच्या काळात नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पाणी कपातीचा निर्णय हा दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहेत.

पाणी कपातीबाबत योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेने पालिका अधिकारी, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते आणि गटनेते यांची एक विशेष अभ्यास समिती स्थापन केली आहे. या समितीच्या बैठका पार पडल्या असून शहरात उपलब्ध असलेला जलसाठा आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन यावर चर्चा झाली आहे. येत्या बुधवारी होणाऱ्या महासभेतही या विषयावर सविस्तर चर्चा करून पुढील धोरण ठरवले जाणार आहे.

​दुसरीकडे, वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमएमआरडीएने मात्र राज्य सरकारच्या सूचनेनुसार १० टक्के पाणीकपात लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून मिळणाऱ्या १७० दशलक्ष लिटर पाण्याऐवजी आता १५३ दशलक्ष लिटर पाणीच उपलब्ध होणार आहे. यामुळे शहरातील पाण्याची नेहमीची तूट आता ८६ दशलक्ष लिटरवर पोहोचणार आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने महापालिकेच्या वतीने कपात लागू न करण्याची विनंती करण्यात आल्याचे स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी सांगितले.

अल-निनोच्या प्रभावामुळे भविष्यात ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहेत. आगामी काळात पाणीकपात यासह शहरातील जुन्या विहिरी, तलाव, बावखले पुनर्जीवित करणे, सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित करणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, अधिकृत कपात लागू झालेली नसली तरी मनवेलपाडा, कारगिल नगर आणि वसई पूर्व पट्ट्यातील अनेक गावांमध्ये सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

पाण्याची सद्यस्थितीत काय?

वसई-विरार शहराची दैनंदिन पाण्याची एकूण गरज ४६९.६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. प्रत्यक्षात सूर्या योजनेतील पेल्हार, धामणी आणि उसगाव धरणांमधून २३० दशलक्ष लिटर आणि एमएमआरडीएच्या सूर्या प्रकल्पातून १७० दशलक्ष लिटर असा एकूण ४०० दशलक्ष लिटर पुरवठा होतो. यातून प्रत्यक्ष वितरण ३८० ते ३९५ दशलक्ष लिटर पाण्याचेच होत असल्याने शहरात रोज सुमारे ६९.६३ दशलक्ष लिटरची तूट आधीपासूनच आहे. शहरात एकूण ७१ हजार नळजोडणी धारक असून प्रतिमाणसी सरासरी १२० ते १२५ लीटर इतके पाणी उपलब्ध करून दिले जाते.

पाणी चोरी रोखण्यासाठी उपाययोजना

पाण्याच्या वाढत्या तुटीच्या पार्श्वभूमीवर पाणीचोरी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कठोर पावले उचलली आहेत. शहरातील वाहनांच्या धुलाई केंद्रांची (वॉशिंग सेंटर्स) तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुख्य जलवाहिनीतून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नुकताच नालासोपारा येथील संतोषभुवन परिसरात पाणीचोरीचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.