वसई: नालासोपारा बस आगारातील एनसीएमसी कार्डाची नोंदणी बंद असल्यामुळे प्रवाशांना विरार बस आगारात जावे लागत होते. मात्र, नालासोपारा बस आगारात नव्या एजंटची नियुक्ती करण्यात आल्यामुळे कार्ड नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली असल्याची माहिती नालासोपारा आगार व्यवस्थापकांनी दिली.
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाकडून पुरवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. वसई विरारसारख्या निमशहरी भागात आजही मोठ्या संख्येने नागरिक एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी एसटी बसचा वापर करतात.
महापालिकेच्या अखत्यारीत येणारे क्षेत्र वगळल्यास ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी आजही प्रवासाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध तसेच कामानिमित्त शहरात ये-जा करणारा कामगार वर्ग एसटी बसने प्रवास करतो. त्यामुळे शासनाने एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याची अट लागू करताच वसई, अर्नाळा व नालासोपारा बस आगारात कार्ड नोंदणी करण्यासाठी अनेक प्रवाशांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
संपूर्ण पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ६५ हजाराहून आधी प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे. पण नालासोपारा आणि वसई बस आगारातील एनसीएमसी कार्ड नोंदणी एजंट अभावी गेले काही महिने बंद होती. यामुळे प्रवाशांना अतिशय विरारमधील अर्नाळा बस आगारात नोंदणीसाठी जावे लागत होते. यामुळे प्रवाशांना तासंतास नोंदणीसाठी रांगेत उभे रहावे लागत होते. तसेच काही प्रवाशांना सवलतीसाठी पात्र असताना देखील कार्डअभावी तिकिटाचे पूर्ण पैसे भरून प्रवास करावा लागत होता.
एकीकडे प्रवाशांची गैरसोय होत असताना दुसरीकडे अचानक वाढलेली प्रवाशांची संख्या, मर्यादित कर्मचारी यामुळे नोंदणी कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे. मात्र, नालासोपारा बस आगाराचे आगार व्यवस्थापक नवनीत गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा बस आगारातील एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी नवा एजंट नियुक्त केल्यामुळे नोंदणी पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे एसटी प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वसई बस आगारातील नोंदणी बंदच
प्रवाशांनी केलेला तक्रारीनंतर वसई बस आगारातील नियुक्त एजंटकडून नोंदणीचे काम काढून घेण्यात आले होते. पण, २ ते ३ महिने उलटून गेल्यानंतरही नवा एजंट नियुक्त न केल्याने वसईतील प्रवाशांची फरफट अजूनही सुरूच आहे.
