वसई: राज्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला असून १० टक्के पाणी कपातीचा आदेश जारी केला आहे. वसई-विरारकरांना आधीच ६९.६३ दशलक्ष लीटर पाण्याच्या तुटीचा सामना करावा लागत असतानाच, राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पाणी टंचाईची समस्या अधिक भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचा प्रस्ताव महासभेत मांडला जाणार असून, त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असून शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वसई-विरार शहराला सूर्या योजनेचे पेल्हार, धामणी आणि उसगाव या धरणांमधून २३० दशलक्ष लीटर, तर एमएमआरडीएच्या सूर्या प्रकल्पातून मंजूर १८५ दशलक्ष लीटरपैकी १७० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होत आहे. असा एकूण ४०० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाण्याचा पुरवठा होत आहे.
शहराची एकूण पाण्याची गरज ४६९.६३ दशलक्ष लीटर इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ४०० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत असून त्यातून प्रत्यक्षात ३८० ते ३९५ दशलक्ष लीटर पाण्याचेच वितरण केले जाते. त्यामुळे शहरात आधीच ६९.६३ दशलक्ष लीटरची तूट आहे. अनेक भागांतील नागरिक पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. त्यातच जर १० टक्के पाणीकपात लागू झाली, तर एकूण तूट जवळपास ११० दशलक्ष लीटरवर पोहोचेल आणि शहरातील पाणीटंचाईचे सावट आणखीनच गडद होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आणि मर्यादित जलसाठा लक्षात घेऊन राज्य सरकारने खबरदारीचे पाऊल म्हणून १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. तसेच याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
वसई-विरार शहरात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची अधिकृत पाणी कपात लागू झाली नसली, तरी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे झाले आहे. पाणी कपात व त्याचे नियोजन या संदर्भात २१ ऑक्टोबरला होणाऱ्या महासभेत प्राधान्याने चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
वसई-विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सद्यस्थितीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासूनच नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी किंवा इतर अनावश्यक कामांसाठी करू नये, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बंधारे बंदिस्तीकडे दुर्लक्ष
वसई पूर्वेतील कामण, चिंचोटी आणि देवकुंडी या भागांतून वाहणाऱ्या नद्या डोंगरमाथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मुख्य मार्ग आहेत. या नद्यांच्या काठावर अनेक गावे आणि पाडे वसलेले असून, उन्हाळ्यात येथील नागरिकांना वापरासाठी याच पाण्यावर अवलंबून राहावे लागते. यासाठी नदीपात्रात ठिकठिकाणी छोटे बंधारे उभारण्यात आले असून, उन्हाळ्यात त्यांना फळ्या लावून पाणी अडवले जाते; ज्यामुळे स्थानिक नागरिकांना पाण्याचा मोठा आधार मिळतो.
दरम्यान, सध्या राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता पाणी अडवणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत म्हात्रे यांनी सांगितले आहे. बंधाऱ्यांना वेळेत फळ्या लावून ते बंदिस्त केले, तर नदीचे वाहते पाणी साचून नागरिकांसह गुराढोरांच्या पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मात्र, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन हे सर्व बंधारे फळ्या लावून बंदिस्त करावेत अशी मागणी रजनीकांत म्हात्रे यांनी केली आहे.
पाणी चोरी रोखण्यासाठी पथके
शहरातील काही भागांत छुप्या मार्गाने अनधिकृत नळजोडण्या घेऊन पाण्याची चोरी केली जात आहे, तर काही नागरिक नळजोडण्यांना थेट विद्युत पंप (मोटार) लावून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसतात. यामुळे शहरातील नियमित पाणीपुरवठ्यावर आणि पाण्याच्या दाबावर विपरीत परिणाम होत असतो. या प्रकारांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी पालिकेने आता विशेष पथके नियुक्त केली आहेत. पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रभाग समिती ‘सी’, ‘एफ’ आणि ‘जी’ अंतर्गत ही तीन विशेष पथके तैनात करण्यात आली असून, अनधिकृत जोडण्या शोधून त्या खंडित करणे आणि दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.
ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा कायम
शहराच्या विवीध ठिकाणच्या भागात पाणी पोहचले असले तरी वसई पूर्वेच्या गावपाड्यातील नागरिकांपर्यँत अजूनही पाणी पोहचले नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना अजूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
