वसई:वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भाग, उंचावर वसलेले आदिवासी पाडे आणि छोट्या गल्लीबोळांमधील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत शहराच्या आवश्यकतेनुसार विविध व्यासाच्या अंतर्गत जलवाहिन्या अंथरण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत असून शहरात सद्यस्थितीत ४०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो. असे असले तरीही, शहरातील अनेक आदिवासी पाडे, दुर्गम भाग आणि अरुंद गल्लीबोळांमधील वस्त्यांमध्ये अजूनही पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशा भागांतील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. या योजनेतून अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेचे बळीकरण करणे, मुख्य व वितरण जलवाहिन्या अंथरणे आणि १० नवीन जलकुंभ उभारणे ही कामे वेगाने सुरू आहेत.
याशिवाय पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गावांमध्ये उभारलेल्या जलकुंभावरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र, गावांचा विस्तार झाल्याने लगतच्या आदिवासी वस्त्या आणि पाडे मुख्य वितरण वाहिन्यांपासून लांब गेले आहेत. अशा ठिकाणी पाणी पोहोचवण्यासाठी एचडीपीआय
आणि जीआय जलवाहिन्या अंथरणे अत्यावश्यक ठरत आहे. दाट लोकवस्तीच्या व अरुंद गल्लीबोळात मोठ्या वाहिन्या टाकणे शक्य नसल्याने तेथे ८० ते १०० मि.मी. व्यासाच्या वाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. नवीन जलवाहिनी अंथरणे, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणादरम्यान खराब झालेल्या वाहिन्या बदलणे, क्रॉस कनेक्शनची दुरुस्ती करणे आणि पॅनल नियुक्त करणे या कामांसाठी पुढील ३ वर्षांकरिता सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव महासभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला होता.
या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना नगरसेवकांनी आपल्या भागातील व्यथा मांडल्या. नगरसेविका ज्योत्स्ना भगली यांनी ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न उपस्थित करत वसई पूर्वेच्या बेलकडी, खोलांडे, देवदल, कर्नाळपाडा, पलाटपाडा यासह अन्य गावपाड्यातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे सांगितले. महापालिकेने तेथील नद्या व विहिरींवर उपाययोजना करून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तर नगरसेवक सुनील आचोळकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून मागणी करूनही केवळ आश्वासने दिली जात असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी सांगितले की शहरातील पाणी विस्ताराचे जाळे कशा स्वरूपाचे आहे याची माहिती व्हावी यासाठी त्याचे सर्व लोकप्रतिनिधींच्या समोर सादरीकरण ठेवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
महासभेत पेल्हार, कोल्ही गाव, कर्नाळपाडा व आसपासच्या दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईवरही लक्ष वेधण्यात आले. उंचावर असलेल्या पाड्यांवर थेट जलवाहिनीद्वारे पाणी पोहोचवणे कठीण असल्याने स्थानिक विहिरी, बोअरवेल आणि छोटे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच पाड्यांवरील पाण्याच्या मूळ स्रोतांचा सर्व्हे करून लवकरात लवकर नळ जोडणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
शहरात टाकल्या जाणाऱ्या जलवाहिन्यांच्या नकाशाबाबतही महासभेत चर्चा झाली. भाजप नगरसेवक हितेश जाधव यांनी जलवाहिन्यांचा नकाशा महापालिकेकडे उपलब्ध आहे का, असा सवाल उपस्थित केला. अनेकदा जलवाहिनी फुटल्यानंतर ती नेमकी कुठे आहे हे शोधण्यात अनेक दिवस वाया जातात आणि खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे हा नकाशा तळागाळातील कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली; तसेच जुन्या व खोलवर गेलेल्या जलवाहिन्या हलवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.
आदिवासी व दुर्गम पाड्यांवर विशेष लक्ष
उंचावर वसलेल्या पाड्यांवर थेट जलवाहिनीने पाणी पोहोचवणे कठीण असल्याने तेथे स्थानिक विहिरी, बोअरवेल आणि छोटे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यावर भर दिला जाणार आहे. महापालिकेकडून या भागातील पाण्याच्या मूळ स्रोतांचा सर्व्हे करून लवकरात लवकर नळ जोडणी दिली जाईल.
शहरातील प्रत्येक नागरिकाला आणि विशेषतः दुर्लक्षित आदिवासी पाड्यांना वेळेत व पुरेसे पाणी मिळणे हा त्यांचा प्राथमिक अधिकार आहे. सर्व जलवाहिन्यांची कामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. स्थानिक जलस्त्रोतांचा विचार करून जलशुद्धीकरण प्रकल्प बसविण्याचे नियोजन केले जाईल.:- अजीव पाटील, महापौर (वसई-विरार शहर महानगरपालिका)
