वसई: सोमवारी पार पडलेल्या वसई विरार महापालिकेच्या महासभेत शहरात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईचा प्रश्न चांगलाच गाजला. मुबलक पाणी असतानाही नियोजनाचा अभाव, नियमित वीज पुरवठा खंडित होणे, जुन्या जलवाहिन्यांमधील तांत्रिक त्रुटी अशा विविध कारणांमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

सोमवारी वसई विरार महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी प्रश्नोत्तरे यांचा विषय सुरू असतानाच भाजप नगरसेवक हितेश जाधव यांनी शहरातील नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत आहे.  नालासोपारा,कारगिल नगर प्रभागातील अनेक सोसायट्या आणि झोपडपट्टी भागात पाणीच मिळत नाही.वीज वारंवार खंडित झाल्यामुळे पाण्याच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडतो. तसेच कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे काही भागात जास्त तर काही भागात कमी पाणी सोडले जात असल्याची तक्रार सदस्यांनी केली. पाणी वितरण करण्यासाठीचा ही विशेष आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी सदस्यांनी केली.

तर दुसरीकडे  धुकटन आणि मासवन या भागातून पाणी पुरवठा होतो. त्या भागात वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या गेली सात ते आठ वर्षांपासून आहे. यावर कायम स्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नगरसेवक पंकज देशमुख यांनी सांगितले. याशिवायसामान्य नागरिक व सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळेपर्यंत व्यावसायिक आणि औद्योगिक जोडण्यांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी महासभेत करण्यात आली. तर दुसरीकडे पाणीपट्टी करवाढ आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे सोसायट्यांना टँकरचे देयक अशा प्रकारे दुहेरी समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी महासभेत सांगितले.

शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महापालिका प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. लवकरात लवकर जलवाहिन्या अंथरणे व अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असे महापौर अजीव पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या काही नागरिकांच्या पाण्याच्या अडचणी आहेत त्याबाबत लक्ष द्यावे अशा सूचना ही त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

महापालिकेकडून सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न

या गोंधळानंतर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेची बाजू मांडली. वीजेच्या ट्रिपिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने १.३८ कोटींचा निधी महावितरणला देऊन वाघोबा खिंडीतील १ किलोमीटरहून अधिकची वाहिन्या कोटिंग केल्या त्यामुळे ८० टक्के ट्रीपिंगची समस्या कमी झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तसेच ‘अमृत योजने’अंतर्गत ४०० किमीपेक्षा जास्त लांबीची जलवाहिनी अंथरणे व नवीन टाक्या उभारण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२७ पर्यँत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीपट्टी करवाढीला भाजपचा विरोध

महासभेत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, घरपट्टी किंवा असेसमेंटच्या तांत्रिक कारणांमुळे कोणाचेही पाणी रोखले जाणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. याशिवाय, वाढीव पाणीपट्टी भरणे शक्य नसलेल्या सोसायट्या व नागरिकांसाठी पाणीपट्टी हप्त्या-हप्त्याने भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी सूचना उपमहापौर मार्शल लोपीस यांनी महासभेत केली. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी पाणी पट्टी करवाढीला आमचा विरोध असल्याचे सांगत गोंधळ घातला.