वसई : वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे महावितरणच्या विद्युत पुरवठ्यात मोठा व्यत्यय आला असून, त्याचा थेट फटका वसई-विरार शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. शहराला पाणी पुरवणाऱ्या तिन्ही प्रमुख योजनांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांपासून वसई विरार शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः पालघरच्या भागात सर्वाधिक पाऊस सुरू आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्यानगर जलशुद्धीकरण केंद्र व कवडसा पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा हा बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून खंडित झाला आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी रात्री महापालिकेची जुनी व नवीन योजना सूर्या धरणावरील मासवन पंपिंग स्टेशन आणि धुकटन जलशुद्धीकरण केंद्र येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. या दोन्ही योजनेतून शहराला प्रतिदिन ३७० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. मात्र विजेअभावी मुख्य पाणी पुरवठा करणारी जलयोजना कोलमडली आहे.

विद्युत पुरवठा पूर्ववत होताच पंपिंग यंत्रणा सुरू करून शहराचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जाईल. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग महावितरण आणि इतर यंत्रणांशी सतत संपर्कात अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. अचानक पाणी कपात झाल्यामुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचा अत्यंत जपून, काटकसरीने व आवश्यकतेनुसारच वापर करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु

​महावितरणच्या पालघर तसेच विक्रमगड-कासा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वादळामुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या तांत्रिक दुरुस्तीसाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.