वसई: उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाच्या प्रखरतेमुळे पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. परंतु वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणी (सुर्या) पेल्हार व उसगाव या तिन्ही धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे. असे जरी असले तरीही शहराच्या अनेक ठिकाणच्या भागात तांत्रिक अडचणीमुळे पाणी न पोहचल्याने पाणी टंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत शहराला सूर्या योजनेच्या धामणी व कवडास , उसगाव , पेल्हार या तीन धरणातून २३० दशलक्ष लीटर तर एमएमआरडीएच्या सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा मंजूर केला आहे त्यापैकी १७० दशलक्ष लीटर असा एकूण ४०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रतिदिन होत आहे.

उन्हाळा सुरू झाला असून त्याच्या उष्णतेच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी कमी होत असते. असे जरी असले तरी मे महिन्याची सुरुवात झाली असली तरी महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तिन्ही धरणांची स्थिती चांगली असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंदाच्या वर्षी धामणी धरणात २७६ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा जमा झाला होता त्यापैकी सद्यस्थितीत १०४.८९२ (३७.९६ टक्के) दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर उसगाव धरणात ४.९६ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा होता. आता २.७०१ (५४.४५टक्के) दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आहे. तर पेल्हार धरणात १.३६० (३८.२० टक्के) दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा शिल्लक आहे.

यावर्षी पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी सुस्थितीत असून १५ जुलै व त्यानंतर ही नागरिकांना पाणीपुरवठा करता येईल असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टंचाईच्या झळा कायम

पाण्याची चिंता मिटली असली तरीही शहरात अजूनही वितरण व्यवस्था पुरेशा प्रमाणात विस्तारली गेली नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. काही भागात कमी अधिक दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यामुळे पाणी साठा उपलब्ध असताना त्याची वितरण व्यवस्था बळकट करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेषतः वसई पूर्वेच्या ग्रामीण भागातील गावपाड्यात ही पाणी पोहचले नसल्याने त्यांना ही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तर काही ठिकाणी टॅंकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

नेमकी अडचण काय ?

सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२४ मध्ये अनधिकृत बांधकामांना नळ जोडणी देऊ नये असे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करताना महापालिकेने अनधिकृत बांधकामे व भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसलेल्यांना नवीन नळजोडण्या देणे बंद केले आहे. या निर्णयामुळे ज्या इमारतींकडे अधिकृत कागदपत्रे नाहीत किंवा जे नागरिक पिढ्यानपिढ्या गाव-पाड्यांत राहत आहेत त्यांना पाणी देण्यास ही अडचणी निर्माण होत असल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

महापालिकेने २०२४ पूर्वी एकूण ६९ हजार ९६१ इतक्या नळजोडण्या दिल्या होत्या.शहरातील पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता नुकताच पार पडलेल्या महासभेत याबाबत धोरण निश्चित करून जुन्या घरांना गावपाड्यातील नागरिकांना प्राधान्याने नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच पाणी प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.