वसई-विरारमध्ये सात महिन्यांत १०९ वेळा वीज खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प

सुहास बिऱ्हाडे
वसई: वसई-विरार शहरात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल होत असताना दुसरीकडे महावितरणाचा सतत खंडित होणारा वीजपुरवठा आणि तांत्रिक कारणामुळे सतत पाणीपुरवठा बंद होत आहे. मागील सात महिन्यांत १०९ वेळा महावितरणाचा वीरजपुरवठा खंडित झाला होता. तर तांत्रिक दोष आणि जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकारामुळे १० वेळा पाणीपुरवठा ठप्प झाला होता.

वसई-विरार महापालिकेला सूर्या पाणी प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातून २२० दशलक्ष लिटर तसेच पेल्हार आणि उसगाव धरणातून मिळून एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असतो. शहराची लोकसंख्या २५ लाख असून शहराला ३५० दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे.

आधीच पाणी गळतीचे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे शहराला दिवसाला १२० दशलक्ष लिटर पाण्याची तूट भेडसावत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरत आली असली तरी नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. सर्वांना समान पाणी मिळावे म्हणून पालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. पाण्याची टंचाई असल्याने नवीन नळजोडण्यादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे विविध कारणामुंळे सतत पाणीपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे आधीच पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांचे पाण्यावाचून आणखी हाल होत आहे. महावितऱ्णाचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असतो. त्याचा फटका पाणी पुरवठय़ावर बसतो. चालू वर्षांंत जानेवारी ते जुलै या सात महिन्यात तब्बल १०९ वेळा महावितरणाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाणी पुरठय़ावर परिणाम झाला आणि नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले. तसेच वितरणव्यवस्थेतील तांत्रिक दोषामुळे १० वेळा पाणीपुरवठा खंडित झाला होता.

वितरण व्यवस्था जुनी

वसई-विरार महापालिकेची वितरण व्यवस्था जुनी आहे. त्यात सातत्याने बिघाड होत असतो. चालू वर्षांंतील सात महिन्यात तब्बल १० वेळा पाणीपुरवठय़ाच्या वितरण व्यवस्थेत बिघाड झाले. त्यात तांत्रिक दोष, जलवाहिन्या फुटणे आदींचा समावेश होता. यामुळे पाणीपुरवाठा अगदी दोन तासांपासून २४ तासांपर्यंत बंद राहिला होता. मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे तर दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प होता.

यंत्रणेचे कार्य

  • शहराला सर्वाधिक म्हणजे २०० दशलक्ष लिटर पाणी हे सूर्या प्रकल्पातून उचलले जाते. पालघर जवळील मासवण येथील उदंचन केंद्रात ते पाणी आणले जाते आणि धुकटण येथील केंद्रात त्याचे शुद्धीकरण केले जाते.
  • मासवण उदंचन केंद्रात ३०० हॉर्स पॉवरचे ७ पंप आहेत तर धुकणट केंद्रात ८०० हॉर्स पॉवरचे ३ आणि ६०० हॉर्स पॉवरचे ४ असे एकूण १४ पंप आहेत. दोन्ही ठिकाणी ३३ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होतो.
  • उंदचंन केंद्रात पाणी आणणे, ते शुद्धीकरण केंद्रात नेणे आणि तेथून पुरवठा करण्यासाठी मोठय़ा क्षमतेची वीज लागते.
  • वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा देखील खंडीत होतो. एक मिनिट जरी वीज खंडीत झाली की सर्व पंप बंद पडतात. एक पंप पुन्हा सुरू  होण्याासाठी १५ मिनिटांचा काळ लागतो. त्यामुळे पाणी पुरवठा बराच काळ खंडीत होतो आणि पुढील पाणीपुरवठा देखील अनियमित दाबाने होत असतो.
  • जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या ७ महिन्यात महावितरणाचा पाणीपुरवठा तब्बल १०९ वेळा खंडित झाला होता. त्यामुळे पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला होता, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.