वसई: वसई-विरार परिसरातील निसर्गरम्य धबधबे, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात दरवर्षी अनेक दुर्दैवी दुर्घटना घडत असतात. मान्सून सुरू होताच मोठ्या संख्येने पर्यटक या भागात गर्दी करतात. मात्र, अनेक अतिउत्साही पर्यटक मद्यपान करून पाण्याच्या प्रवाहात जाणे, स्टंटबाजी करणे, उंच ठिकाणाहून पाण्यात उड्या मारणे आणि पाण्याचा अंदाज नसतानाही पाण्यात उतरणे अशा गोष्टी करतात. यामुळे बुडण्याच्या आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहात अडकण्याच्या घटना घडतात. या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने या पर्यटन स्थळांवर १५ जुलैपर्यंत बंदी घातली आहे.
परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक वीरकर आणि परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी वसई, नायगाव, वालीव, अर्नाळा, विरार, पेल्हार, मांडवी, बोळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांवर ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ चे कलम १६३ (१) (२) नुसार मनाई आदेश लागू केला आहे. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल, त्याच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.
या आदेशानुसार वसईमधील सुरुची, रानगाव, भुईगाव, बेनापट्टी, ब्राम्हण पाडा हे समुद्र किनारे, तसेच देवकुंडी (कामण), चिंचोटी धबधबा आणि राजावळी खदाण या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. तसेच विरारमधील फुलपाडा डॅम, कुंभारपाडा तलाव, तुंगारेश्वर धबधबा, जेट्टी परिसर, तानसा नदी, पेल्हार धरण आणि अर्नाळा, कळंब, नवापूर, राजोडी या समुद्र किनाऱ्यांवरही पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पावसाचा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठीच प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, नागरिकांनी आणि पर्यटकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटकांनो हे नियम लक्षात घ्या ?
कोणत्याही पर्यटन स्थळावर पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असेल. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोल पाण्यात उतरण्यास आणि धबधब्यांच्या प्रवाहाखाली बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे आणि धोकादायक वळणांवर सेल्फी काढणे किंवा कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे. निसर्गनिर्मित धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, त्याची वाहतूक करणे, अनधिकृत विक्री करणे आणि उघड्यावर मद्य पिणे यावर पूर्णपणे बंदी असेल. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे किंवा ध्वनिक्षेपक लावून ध्वनी प्रदूषण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
