वसई: गेल्या तीन दिवसात वसई विरार शहरात झालेल्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे. जागोजागी साचलेले गुडघाभर पाणी, दुथडी भरून वाहणारे नाले, नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी आणि विस्कळीत झालेले जनजीवन यामुळे शहरातील नालेसफाईबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तसेच शहराची अवस्था पाहता नालेसफाईच्या आडून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई करावी अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

वसई विरार शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर तीन दिवस पडलेल्या या पावसामुळे जागोजागी पाणी साचले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विविध भागातील पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग अवैध मातीभराव, कचरा, तसेच डेब्रिज यामुळे बंद झाल्यामुळे बाजारपेठा, चौक आणि रस्त्यांमध्ये पाण्याची लहान लहान डबकी तयार झाली आहेत.

तसेच वसईच्या वाघराळ पाडा परिसरात ५ वाहने पाण्याच्या प्रवाहासह वाहून गेल्याची घटना देखील घडली होती. तसेच बऱ्याच भागातील साचलेले तीन दिवस उलटून गेल्यानंतरही ओसरले नसल्यामुळे महापालिकेकडून नालेसफाईबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांवर शंका व्यक्त केली जात आहे. तसेच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी त्यांनी नालेसफाईतील शेकडो कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसह शहर अभियंता पदावर तात्काळ सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती, नीरी संस्थेच्या सर्व शिफारशींची तातडीने अंमलबजावणी व बावखलांच्या संवर्धनासाठी  स्वतंत्र धोरण जाहीर करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, १५ दिवसांच्या आत वसई-विरार महापालिकेत सक्षम शहर अभियंत्याची नियुक्ती करण्यात येणार असून नालेसफाईच्या कामांची आठ दिवसांत चौकशी करून त्याबाबतचा  अहवाल सादर करण्यात येईल. तसेच अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच पूरनियंत्रणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून अमृत, अर्बन चॅलेंज, मित्र व इतर योजनांमधून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.