वसई: गेल्या आठवड्यात वसई विरार शहरात पडलेल्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाल्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. मात्र, पावसाने विश्रांती घेताच जिल्हातील कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ नोंदली गेली असून नागरिकांना पुन्हा उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे.
तीव्र वातावरणीय बदलांमुळे यंदा नागरिकांना दीर्घकाळ उन्हाळ्याचा सामना करावा लागला. प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती आणि कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे एप्रिल ते मे दरम्यान अनेकदा उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती शहरात निर्माण झाली होती. तर जून महिन्यातही अत्यंत तुरळक पाऊस पडल्यामुळे शहरातील वातावरणात फारसा बदल झाल्याचे पाहायला मिळाले नाही.
मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वसई विरार शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. सलग चार ते पाच दिवस पडलेल्या या पावसामुळे शहरातील कमाल तापमानात काहीशी घट झाल्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. यामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून काहीकाळ दिलासा मिळाला.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे जिल्ह्यातील कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ नोंदली गेली आहे. सोमवारी डहाणू येथे ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तर मंगळवारी ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. कमाल तापमानात काहीशी वाढ होत असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
