वसई: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबई, गुजरातमधील विविध स्थनाकातून ८ विशेष गाड्यांच्या ४२ फेऱ्या चालविण्यात निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे पश्चिम उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई, पालघर, बोरिवली या पश्चिम उपनगरीय परिसरात मोठ्या संख्येने कोकणवासी वास्तव्यास आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर व लोकमान्य टिळक टर्मिनस या मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकातून कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्या सुटत असल्यामुळे पश्चिम उपनगरीय परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना लांबचा प्रवास करून ही स्थानके गाठावी लागत होती.

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने ८ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या आठ गाड्यांच्या माध्यमातून मुंबई आणि गुजरातहून कोकणासाठी ४२ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्या ९ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध दिवशी धावणार असून, ९ ऑगस्टपासून तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरु होणार आहे. या विशेष गाड्यांमुळे पश्चिम उपनगरीय प्रवाशांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या या विशेष गाड्या गुजरात, मुंबई आणि कोकण पट्ट्याला जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. यामध्ये मुंबई व उपनगर परिसरातील मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, बोरीवली, वसई रोड, भिवंडी रोड आणि पनवेल या मुख्य स्थानकांचा समावेश आहे; तर कोकण रेल्वे मार्गावर रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना चढता-उतरता येईल. याशिवाय गुजरातहून सुटणाऱ्या गाड्यांसाठी वडोदरा, सूरत, उधना, वलसाड, वापी आणि पालघर, तर ठोकूरपर्यंत जाणाऱ्या गाड्या गोव्यातील मडगाव, थिविम आणि कर्नाटकमधील कारवार, उडुपी, ठोकूर या स्थानकांवर थांबतील.

ट्रेननिहाय फेऱ्यांचा तपशील:

  • मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल (०९०१३/०९०१४): ०२ फेऱ्या
  • मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड (०९०१९/०९०२०): १६ फेऱ्या
  • बांद्रा टर्मिनस – रत्नागिरी (०९०३५/०९०३६): ०४ फेऱ्या
  • वलसाड – रत्नागिरी – वलसाड (०९०३०/०९०२९): ०२ फेऱ्या
  • उधना – रत्नागिरी – उधना (०९०२२/०९०२१): ०४ फेऱ्या
  • वडोदरा – रत्नागिरी – वडोदरा (०९११४/०९११३): ०२ फेऱ्या
  • विश्वामित्री – रत्नागिरी (०९११०/०९१०९): ०८ फेऱ्या
  • विश्वामित्री – रत्नागिरी – विश्वामित्री (०९१२४/०९१२३): ०४ फेऱ्या