वसई:- वाढते शहरीकरण, भूमाफियांचे वाढलेले धाडस आणि प्रशासकीय अनास्थेमुळे वसई-विरार शहरातील नैसर्गिक पाणथळ जागा आणि खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पाणथळ जागांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १२८ ठिकाणच्या पाणथळ जागांचे सर्वेक्षण महसूल विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी दोन पथके ही नियुक्त केली आहेत.

पाणथळ जमिनी या शहरांसाठी भूजलाचा एक उत्तम स्रोत म्हणून ओळखल्या जातात. याशिवाय पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्या अतिरिक्त पाणी शोषून घेण्याचे काम करतात. खारफुटी किंवा कांदळवन अशा पाणथळ जागांच्या वैशिष्ट्यासह गवताळ प्रदेश, खाजण जमिनी, नद्या, खाड्या, डबकी या सर्वांचा समावेश आहे. अशा पाणथळी भागांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलली जात नाहीत. त्याउलट अशा जागांचे महत्व लक्षात न घेता केवळ मोकळ्या जागा समजून त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे निर्णय घेतले जात आहे.

अनेक भागांतील पाणथळ जागांवर अतिक्रमणे होत असल्यामुळे हे क्षेत्र धोक्यात आले आहे. या जागांच्या संवर्धनासाठी ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट, चेन्नई’ने राज्य पाणथळ प्राधिकरणाला एक ‘ब्रीफ डॉक्युमेंट’ आणि विवरणपत्र पाठवले आहे. या कागदपत्रांच्या आधारे, त्या जागा खरोखरच पाणथळ आहेत का आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वसईतील १२८ ठिकाणच्या भागातील पाणथळ जागांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी दोन पथके नियुक्त केली आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून सर्वेक्षण पूर्ण केले जात आहे. यात महसूल कर्मचारी यांच्यासोबत भूमिअभिलेख, महापालिकेचे नगररचना अधिकारी, वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, मत्स्यव्यवसाय आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी पथकाला केवळ पाहणी न करता जिओ-टॅग फोटो, व्हिडिओ शूटिंग, स्थानिक जबाब आणि पंचनामा करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक पाणथळ क्षेत्राची पाहणी करून झाली असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

या भागात सर्वेक्षण

पाणथळ जागांच्या सर्वेक्षणासाठी दोन पथक नियुक्त केली आहेत. पथक प्रमुख म्हणून नायब तहसीलदार शशिकांत नाचण आणि निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांची नियुक्ती केली आहे. या पथकाकडून चिंचोटी, कामण, मोरी, नागले, कोल्ही, ससूनवघर, जुचंद्र, बापाणे, देवदळ, बिलालपाडा, धानीव, नालासोपारा, सातिवली, गोखिवरे, घाटीम (नवघर), राजावली, भालीवली, चांदीप ,मेढे, विरार, शिरगाव, अर्नाळा किल्ला, अर्नाळा, आगाशी, वटार, चिखलडोंगरे, नाळे, बोळींज, कसराळी आणि डोलीवपाडा या भागांतील जागांची पडताळणी करण्यात येत आहे.

आतापर्यंत ६० टक्के पाणथळ क्षेत्राची पाहणी करून झाली असल्याचे निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांनी सांगितले आहे. जर पाणथळ जागेत अतिक्रमण होत असेल तर त्याची माहिती महसूल व महापालिका प्रशासनाला देण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पाणथळ जागेच्या संवर्धनाची गरज

जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न आणि पक्ष्यांच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण अधिवास असलेल्या पाणथळ जागा शहरात आहेत. परंतु सद्यस्थितीत या जागा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. पाणथळ जागा व तेथील जैवविविधता सुरक्षित राहिली तरच विविध प्रजातींचे पक्षी त्या ठिकाणी येतील यासाठी अशा पाणथळ जागांचे संवर्धन होणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी केली आहे.