वसई: नागरिकांची होणारी गैरसोय आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे वालीव येथील जी प्रभाग समितीचे कार्यालय वसई पूर्वेतील फादरवाडी येथील बहुउद्देशिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले होते. पण, या नव्या इमारतीतील उद्वाहक यंत्रही बंद असल्यामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वसई पूर्वेला वालीव नाका येथे जी प्रभाग समितीचे कार्यालय आहे. नगरपालिकेशी संबंधित समस्यांचे निराकरण, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, रस्ते आणि गटारे दुरुस्ती, परवाने नूतनीकरण अशा विविध कामांसाठी नागरिक या कार्यालयाग ये-जा करत असतात. पण, वालीव कार्यालय उद्वाहक तसेच इतर सोयीसुविधा नसल्यामुळे ते नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. त्यामुळे महापालिकेने जी प्रभाग समितीचे कार्यालय वसई पूर्वेतील फादरवाडी येथील बहुउद्देशिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर महिन्याभरापूर्वी स्थलांतरित करण्यात आले होते.
पण, आता या नव्या इमारतीतील उद्वाहक यंत्रही बंद असल्यामुळे शासकीय कामांसाठी कार्यालयात येणारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना दोन मजले चढून कार्यालय गाठावे लागत आहे. एखाद्या कामासाठी अनेकदा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्यामुळे त्यांची दमछाखही होत आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून मात्र अपेक्षित उत्तर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
“शासन सुलभ भारत अभियानांतर्गत प्रशासनाने नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवणे गरजेचे आहे. मात्र कार्यालयात उपलब्ध असलेले उद्वाहक यंत्र सुरू न करून पालिका दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत आहे. यासंबंधी प्रभाग समिती अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल”, अशी प्रतिक्रिया अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास केंगार यांनी दिली आहे.
यासंबंधी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

