वसई:- वसई पश्चिमेकडील कृष्णा टाऊनशिप परिसरातील नैसर्गिक नाल्यावर सध्या एका पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मात्र, या बांधकामासाठी महापालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामामुळे खाडीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊन आगामी पावसाळ्यात संपूर्ण वसई पश्चिम भाग पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
वसई पश्चिमेच्या भागात कृष्णा टाऊनशीप परिसर आहे. या भागातील नैसर्गिक नाल्यावर पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. नियमानुसार कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी बांधकामाच्या ठिकाणी महापालिकेच्या परवानगीचा फलक लावणे अनिवार्य असते. मात्र, कृष्णा टाऊनशिप मैदानाजवळ सुरू असलेल्या या पुलाच्या ठिकाणी असा कोणताही फलक लावण्यात आला नाही. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांना ही या पुलाच्या कामाबाबत माहीत नसल्याचे सांगण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे.
याच भागात महसुल विभागाने जुलै २०२५ रोजी ९९ हजार ब्रास इतका अनधिकृत माती भराव बाबत नोटीस काढली होती. परंतु सदर भराव सुरूच आहे. त्यात आता अगदी नैसर्गिक नाल्यावर पुलाचे अनधिकृत बांधकाम होत आहे.वसईत मागील १० वर्षापासून सातत्याने बुडत आहे. पूर परिस्थिती दरवर्षी भयानक बनत आहे अशावेळी नैसर्गिक नाल्यावर अनधिकृत बांधकामे, भराव यामुळेच वसई कायमची बुडविण्याची नियोजन वसई प्रशासन करीत असल्याचा आरोप ही डाबरे यांनी केला आहे.
चौकशीची मागणी
वसई विरार मधील पूरसमस्या ही दिवसेंदिवस अधिकच जटिल बनली आहे. अशात अशा प्रकारे नैसर्गिक नाले बुजवून पुलाची उभारणी होत असेल तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
या पुलाचे बांधकाम नेमके कोण करीत आहे आणि कशासाठी याची सखोल चौकशी करण्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी केली आहे.
पुलाच्या कामच्या संदर्भात त्या भागातील इंजिनिअर ला पाठवून त्याची सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल असे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

