वसई: गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्प दंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच वसई विरार शहरात सर्प दंश होण्याच्या घटना समोर येत आहेत. नुकताच व विरार पूर्वेच्या शेतात काम करत असताना विषारी साप चावल्याने गंभीर जखमी झालेल्या एका ५३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुमन मारुती कोम (५३)मृत महिलेचे नाव आहे.
पावसाळा सुरू होताच सापांचा वावर वाढला आहे. साप निवारा घेण्याच्या शोधात व अन्नाच्या शोधासाठी बाहेर पडतात. तर काही वेळा साप अडी- अडगळीच्या ठिकाणी जाऊन लपून बसतात. वसईचा बहुतांश परिसर हा डोंगराळ व शेतीचा भाग असल्याने अशा ठिकाणी सापांचा वावर हा अधिक प्रमाणात दिसून येतो. यामध्ये नाग, घोणस, मण्यार, फुरसे, यासह इतर प्रजातीचे साप आढळून येतात. विशेषतः शेती वाडीत, अडचणीच्या ठिकाणी काम करताना सर्प दंश होण्याच्या घटना घडतात.
सुमन कोम या सुद्धा ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी उसगाव-भाताणे येथील आपल्या शेतात काम करत होत्या. याच दरम्यान त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला एका विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, पारोळ येथे प्रथमोपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नालासोपारा येथील महानगरपालिका रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना मुंबई कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८ ऑगस्ट २०२६ पासून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र १० ऑगस्टला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सुरुवातीला कांदिवली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली होती. मात्र घटना मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने प्रकरण वर्ग होऊन मांडवी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
