भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील बहुतांश रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिरा-भाईंदर शहर खड्डेमुक्त ठेवण्याचे धोरण महापालिकेने निश्चित केले आहे. त्यासाठी शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी खड्डे दुरुस्तीसाठी मोठा निधी खर्च केला जातो. मात्र, असे असतानाही शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.

शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडी वाढत आहे. तसेच वाहनांचा वेगही मंदावला आहे. याशिवाय खोल खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दुरुस्तीनंतरही खड्डे

मिरा-भाईंदर शहरातील खड्डे भरल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. तसेच मुख्य मार्गांवरील खड्डे भरण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे असल्याने त्यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. संबंधित खड्ड्यांचीही दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसून येत आहेत.

समाजमाध्यमांवर संताप

शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने या परिस्थितीसाठी महापौर डिंपल मेहता यांना जबाबदार धरत विविध मीम्स आणि टीकात्मक पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

पोलिसांकडून नोटीस

मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत पोलिसांनीही कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या महिनाभरात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नऊ अपघात झाल्याची नोंद आहे. त्यामुळे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत महापालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती काशीमिरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.