वसई: वसई पश्चिमेतील बाभोळा नाका परिसरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे शिल्प उभारण्यात आले आहे. मात्र, या शिल्पाच्या देखभाल दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या शिल्पाची दुरावस्था झाली होती. मात्र, आदिवासी दिनानिमित्त शिल्पाची स्वच्छता करून त्याला कृत्रिम फुलाच्या माळांनी सजवल्यामुळे या शिल्पाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. तर आदिवासी दिनानिमित्त का होईना पालिका प्रशासनाला अखेर जाग आली, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वसई विरार शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडून करोडो रुपये खर्च करून शहरातील मुख्य रस्ते आणि पर्यटनस्थळी सुशोभित चौक आणि शिल्पे उभारण्यात आली होती. तसेच ज्या ठेकेदारांनी ही शिल्पे आणि चौक उभारले त्यांना त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राटही देण्यात आले होते. मात्र, ठेकेदारांनी केलेले दुर्लक्ष आणि पालिकेकडून अशा निष्काळजी ठेकेदारांवर कारवाईचा अभाव यामुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही शिल्पे आणि चौक आता धुळीच्या आणि अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहेत.

काही ठिकाणी शिल्पांची झालेली मोडतोड, बंद पडलेल्या प्रकाशयोजना, कारंज्यांमधील गढूळ झालेले पाणी, कचऱ्याने चौकांना घातलेला वेढा आणि शहरातील आजी – माजी नगरसेवक, आमदार आणि खाजगी संस्थांकडून या चौक आणि शिल्पांवर सुरु केलेली फलकबाजी यामुळे त्यांचे सौंदर्य मावळले आहे. मात्र, वसई पश्चिमेतील बाभोळा नाका परिसरात तारपा नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या शिल्पाला स्वच्छ करून कृत्रिम फुलांच्या माळांनी सजवण्यात आल्यामुळे दुर्लक्षित शिल्पाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

पालिकेने फक्त ठराविक दिवशीच शहरातील शिल्पांची स्वच्छता करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यापेक्षा नियमितपणे त्यांची देखभाल केली पाहिजे, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.