हलगर्जीमुळेच वाहनकोंडी

महामार्ग व शहरांतर्गत रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

महामार्ग प्राधिकरण, पालिकेच्या दुर्लक्षामुळे समस्या गंभीर बनल्याचे खासदारांच्या बैठकीत आरोप

वसई : महामार्ग व शहरांतर्गत रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पालघर जिल्ह्य़ाचे खा. राजेंद्र गावित यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत विविध विभागांकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे आरोप – प्रत्यारोप करण्यात आले.

वसई विरारमधून गेलेला महामार्ग व शहरांतर्गत रस्ते यावर झालेली अतिक्रमणे, अपुरे रस्ते, बेवारस वाहनांचा प्रश्न, महामार्गावरील सेवा रस्ते, पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद, बंद वाहने हटविण्यासाठी यंत्रणेचा अभाव, शहरात व महामार्गावर अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडी होऊ  लागली आहे. याचा मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. यासाठी खा. राजेंद्र गावित यांनी मंगळवारी वसईच्या बालाजी सभागृहात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभाग, आयआरबी अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.

महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याचा परिणाम हा वाहतुकीवर होत आहे. परंतु आयआरबी व महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत योग्य त्या उपाययोजना व सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.नऊ  महिन्यांत झालेल्या अपघातांत जवळपास ६९ जणांचा बळी गेला आहे.   प्राधिकरणाच्या व आयआरबी यांच्या भोंगळ कारभारावर राजेंद्र गावित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ज्या उपाययोजना आहेत त्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून पूर्ण कराव्यात अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vehicle congestion negligence ysh

Next Story
चंद्रपाडा- वाकीपाडय़ातील पाणीप्रश्न मार्गी
ताज्या बातम्या